वर्धा : मुक्या जीवांचा वाली कोण, असा प्रश्न नेहमी उपस्थित केल्या जात असतो. कारण विविध प्रकारे या प्राण्यांचा छळ होण्याच्या घटना नित्य घडत असतात. काही पशुप्रेमी संघटना कार्य करीत असल्याने हे जीव थोडे तरी सुरक्षित असल्याचे चित्र आहे. कुणीतरी रस्त्यावर निष्काळजीपणे फेकून दिलेल्या एका प्लॅस्टिकच्या भांड्याने जीव घ्यायचेच बाकी ठेवले होते. यात एका श्वानाचे मुंडके फसले. अख्खे डोके अडकल्याने त्याचे चांगलेच हाल होवू लागले. कारण ना पाणी, ना अन्न मिळत असल्याने तो सैरभैर झाला होता. हा प्रकार प्रथम पाहणाऱ्यांनी प्रयत्न केले. पण श्वान पसार झाले. त्यातच विसावा या पशुप्रेमी संस्थेच्या हेल्पलाईनवर ही माहिती टाकली. त्यास चार पाच दिवस लोटले.
संस्थेच्या चमूने शोध घेण्यास सुरवात केली. पण पत्ता लागत नव्हता. कारण तो श्वान इकडे तिकडे पळत होता. शेवटी गुरुवारी सायंकाळी प्रतापनगर परिसरातील मुनोत लेआऊट भागातील सुधीर चाफले या व्यक्तीने विसावा हेल्पलाईनवर संपर्क केला. तो श्वान त्यांच्या घरापुढील नालीत लपून बसल्याचे कळविण्यात आले. यास सव्वीस दिवस लोटत होते. विसावाचे अध्यक्ष किरण मोकदम , त्यांच्या पत्नी सारिका मोकदम तसेच सहकारी धमाने आणि अन्य दहा मिनिटात घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी केल्यावर एक बाब अडचणीची ठरली. श्वान ज्या नालीत लपून बसला होता ती नाली एका बाजूला बंद पडली होती. लगतच्या घर मालकाने सुरक्षा म्हणून त्या नालीवर कडप्पा फरशी टाकण्यात आली होती. ते दूर करणे एक दिव्यच होते.
हेही वाचा : भारत-जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प, महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात ‘पायलट प्रोजेक्ट’
पशूप्रेमी स्वयंसेवक यांची हुशारी पणाला लागली. एक एक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र कुणीतरी पकडण्यासाठी येत आहे या भीतीपोटी त्या श्र्वानाने बचाव चमूवर झेप घेणे सुरू केले. मात्र अखेर दीड तासाच्या प्रयत्नांती तो श्वान आटोक्यात आला. त्याला बाहेर काढण्यात आले.आता पुढे दिव्य कर्म होतेच. या कामी मग बचाव चमूच्या मदतीला स्थानिक रहिवासी असलेले माजी मुख्याध्यापक विजय भोयर हे धावून आले. अखेर तडफडणाऱ्या मुक्या जीवाची सुखरूप मुक्तता झाली. या दीड तासाच्या ‘ ऑपरेशन फ्रीडम ‘ घडामोडीस काहींनी मोबाईल मध्ये कैद पण केले.
हेही वाचा : कविवर्य राजा बढे यांच्या राज्यगीताची कोनशिला कचऱ्यात
सुटका होताच गलितगात्र श्वान तश्याही स्थितीत पळाले. विसावाने ही सुटका आटोपल्यावर एक आवाहन केले.रिकाम्या झालेल्या खाद्य पदार्थांच्या प्लास्टिक भांडी उघड्यावर फेकू नये. कारण भटके जीव खाद्य शोधण्याच्या मोहात त्यात अडकून पडतात.म्हणून अशी प्लास्टिक भांडी चपटी करीत त्याची कचऱ्यात विल्हेवाट लावावी, असे सांगण्यात आले.