वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पक्षप्रवेशांनाही उधाण आले आहे. वर्ध्यातील काँग्रेसच्या एका कार्यक्रमातील एक उपस्थिती आता चर्चेत आली आहे. पाणी फउंडेशनचे अग्रेसर पुरस्कर्ते तसेच लोकप्रिय बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या सभेत उपस्थित राहून केलेले भाषण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.

डॉ. पावडे यांची राजकीय मनीषा लपून राहलेली नाही. गतवेळी त्यांनी वर्धा विधानसभेसाठी भाजपच्या नेत्यांची विश्रामगृहावर भेट घेतली होती. तर यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांची चर्चा झाली होती. पण, त्यांनी आमदार रणजित कांबळे व यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढण्याचा माझा मानस नाहीच, असे त्यांनी स्पष्ट करून टाकले होते. त्यामुळे काळे यांच्या सभेत ते कसे, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

हेही वाचा…“निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले..,

काँग्रेसची सभा चरखाघर येथे आयोजित करण्यात आली होती. पण ते स्थळ वेळेवर रद्द झाले. आता करावे काय म्हणून रणजित कांबळे यांनी डॉ. पावडे यांना विचारणा केली. कारण त्यांचे बायपासवर इव्हेंट हे भव्य सभागृह आहे. ते मिळाले. त्यात सभा संपन्न झाली. योगायोगाने हजर डॉ. पावडे यांना सभेत उपस्थित राहण्याची तसेच व्यासपीठावर बसण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली.

हेही वाचा…“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले…

एवढेच नव्हे तर भाषण देण्याचे सूचविण्यात आले. त्यास मान देत डॉ. पावडे यांनी भाषणही दिले. काळे व मी आर्वीत असतानापासून मित्र आहोत. आमच्यात स्नेह आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आज उपस्थित आहे. याचे वेगळे अर्थ कृपया काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर याबाबत म्हणाले की, हो हे खरे आहे. ते सहज उपस्थित होते. त्यांनी पक्षात प्रवेश केलेला नाही. एक सद्भावना म्हणता येईल. पण डॉ. पावडे यांच्या उपस्थितीकडे पुढील काळातील राजकीय घडामोडींचा एक सूचक इशारा म्हणून पाहिल्या जात आहे.

Story img Loader