वर्धा : द काश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याचे मान्यवर लोकांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आले होते. हा चित्रपट गाजण्यामागे एक प्रमुख नाव होते या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री. तथ्य असल्याचा त्यांचा दावा चांगलाच गाजला. आता त्यांनी परत एका चित्रपटाची घोषणा केली आहे. द काश्मीर फाईल्सने लाखोंचे डोळे उघडले, द दिल्ली फाईल्स अनेकांची झोप उडवणार, असे विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले.
येथील जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे सेवा सत्कार सोहळ्याचे आयोजन मकरसंक्रांत पर्वावर केल्या जाते. आज आयोजित या सोहळ्यास दिग्दर्शक अग्निहोत्री तसेच प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने देशातील लाखोंचे डोळे उघडले, तर आता मी ‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट तयार करीत आहे. तो अनेकांची झोप उडवेल. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे. या लढ्याचे खरे चित्र पुढे आलेच नाही. खोटा इतिहास मांडण्यात आला. चुकीची माहिती देण्यात आली. म्हणून खरे काय घडले ते मी मांडणार. त्या काळात झालेले अत्याचार चित्रपट सांगेल. सत्याची मांडणी केली तर फतवे निघतात. पण मी त्याची चिंता करीत नाही. वर्धेशी माझे जवळचे नाते आहे. माझी आजी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याने तिला वर्धा येथील कारागृहात डांबण्यात आले होते.
हेही वाचा : भारतात निश्चित लक्ष्याच्या तुलनेत जलविद्युत निर्मिती कमी! केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार…
येथील शिक्षा मंडळ ही संस्था जमनालाल बजाज वादविवाद स्पर्धा आयोजित करीत असते. या स्पर्धेत पाच वेळा मी प्रत्येकी दहा हजार रुपयाचा पुरस्कार जिंकला होता. त्यामुळं मला घरी कधीच पैसे न मागता वाटचाल करता आली. विदेशात अनेक वाऱ्या केल्या. सर्वाधिक विश्वास भारतीयांवर असल्याचा माझा अनुभव आहे. इथली पिढी इथेच राहावी असे वाटत असेल तर तिला भारतमातेची महती सांगितली पाहिजे, असे अग्निहोत्री यांनी नमूद केले.
हेही वाचा : नागपुरात करोनाची नवीन लाट ओसरतेय! आता केवळ इतकेच रुग्ण
डॉ.तात्याराव लहाने यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाच वेळा पाहल्याचे नमूद केले. परीक्षेच्या अभ्यासाने ज्ञान मिळत नाही. माझी आई व बाबा आमटे हे माझे प्रेरणा स्त्रोत असल्याचे ते म्हणाले. संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पीएचडी प्राप्त करणाऱ्यांचा विद्याभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सचिन अग्निहोत्री यांनी संस्थेची माहिती दिली.