वर्धा : अंधश्रद्धा निर्मुलन करण्यासाठी सामाजिक चळवळी राबवल्या गेल्या. त्यातून कठोर कायदाही पुढे आला. एकीकडे समाज आधुनिक विज्ञानाची कास धरत असतानाच दुसरीकडे अंधश्रद्धेची पिलावळही अद्याप वळवळत असल्याच्या घटना समोर येतच आहे. गुप्तधन शोधण्यासाठी दुर्मिळ मांडूळ साप उपयुक्त ठरतो, अशी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा चालत आली आहे. त्यालाच बळ देणारी ही घटना. आज याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलू तालुक्यातील हिंगणी वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ३ किलो ६०० ग्रॅम वजनाचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील केशव लक्ष्मण भराडी, मालेगाव येथील सिद्धार्थ धोंडबा कांबळे, नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याचा तुकाराम ज्ञानेश्वर छापेकर, टाकळघाट ता. हिंगणा येथील अनिलकुमार नायक व मालेगाव येथील मजहर मोहम्मद जाफर मालवी अशी आरोपीची नावे आहेत. त्यांच्याकडून मारोती कार, वजनकाटा, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाशीम येथील आरोपीनी नागपूरच्या काहींसोबत मांडूळ साप खरेदीचा सौदा केला. त्यासाठी साप घेऊन त्यांना बुटीबोरी येथे बोलावण्यात आले. मात्र नंतर सेलूत या असे सांगितले. याची कुणकुण लागताच वन अधिकाऱ्यांनी जाळे टाकले. त्यांना सेलूच्या न्यायालयात हजर करीत पोलीस कोठडी घेण्यात आली. वनसरक्षक हरवीर सिंग व सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात ए. आर. आगाशे, डी. एम. उईके, जी. एम. मोहर्ले,बी. एस. आडे, एस. आर. डाकोरे, आर. बी. पानतवणे यांच्या चमुने ही कारवाई केली.

अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वरिष्ठ मार्गदर्शक पंकज वंजारे यांनी एकाचवेळी दुर्मिळ मांडूळ प्रजातीचे पाच साप मिळणे ही धक्कादायी बाब असल्याचे नमूद केले. पैशाचा पाऊस पाडणे, गुप्तधन शोधणे, तंत्रमंत्र, असे प्रकार करणाऱ्या टोळ्याच आहेत. त्या साप पकडणाऱ्यांच्या संपर्कात असतात. साप सापडले की त्याची मग बोली लागते. चढ्या दराने हे साप विकल्या जातात. म्हणून या प्रकरणात हे साप कुठून आणले, याची कसून चौकशी व्हावी. हे निश्चित मोठे रॅकेट आहे.