वर्धा : चार पैसे अधिकचे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कडक मोहीम पोलीसांनी हाती घेतली आहे. जिल्ह्याबाहेरून येणारा जिन्नस खबरींच्या माहितीवरून पकडल्या जात आहे. वर्षभरात लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अशी पकडापकडी सुरू असल्याने बेकायदेशीर काम करणाऱ्या एकाने उत्तर शोधले. हिंगणघाट येथे जगन्नाथ वॉर्डातील आकिब शेख सलाम या युवकाने त्याचा घरातच अंमली पदार्थ तयार करण्याची फॅक्टरी सुरू केल्याची खबर गुन्हा शाखेला लागली.
हेही वाचा : पतंग उडवताय? मग आधी हे वाचाच…..
छापा टाकण्यात आला. पोलीसांना घरात काही सापडले नाही म्हणून घराच्या गच्चीवर झाडाझडती सुरू केली. तेव्हा गांजाची झाडे दिसून आली. दोन ते अडीच फुटाची ४२ झाडे डौलत होती. त्याचे वजन ३६९ ग्रॅम भरले असून किंमत साडेचार हजार रुपये एवढी भरते. हे बेकायदेशीर कृत्य म्हणून एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार हुडकून काढत कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, उप विभागीय अधिकारी रोशन पंडित यांनी मार्गदर्शन केले. तर प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुळक, उपनिरीक्षक रमेश मिश्रा तसेच पोलीस शिपाई प्रवीण देशमुख, सुनील माळनकर, नरेंद्र आरेकर, दीपक हाके, विजय हरणुर, सागर संगोळे या चमूने केली आहे.