वर्धा : शासन नित्य नवे निर्देश, आदेश, पत्रक काढून त्याचा अंमल व्हावा म्हणून दक्ष राहण्याची सूचना करते. पण प्रत्यक्षात त्याची बजावणी गांभीर्याने घेतली जाते, असे दिसून येत नाही. मग तक्रारी होतात आणि परत निर्देश देत अहवाल मागितल्या जातो. आता हेच राज्य गीताबाबत घडले. कवी नीलकंठ बढे लिखित ‘ जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत महाराष्ट्र शासनाने अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले. तशी शासकीय मान्यता आली. तरुणाई, सर्व नागरिकांना स्फूर्ती देणारे व महाराष्ट्राच्या शोर्याचे मानबिंदू असणारे हे अस्मिता दर्शक गीत शाळेत गायला जावे म्हणून आदेश निघाले.

पण सर्वच माध्यमाच्या शाळांमध्ये ते गायल्या जात असल्याबद्दल साशंकता होती. आता राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी याबाबत भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हे राज्य गीत गायल्या गेलेच पाहिजे, तसे त्यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निर्देश दिले आहेत.

शाळांचे दैनिक सत्र सूरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना यासोबतच राज्यगीत गायले जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तशी दक्षता घेण्याची सूचना आहे. यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरसिंग मार्फत वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण आयुक्त यांनी पण अंमलबजावणी बाबत खबरदार केले आहे. आता परत राज्य गीत शाळेत गायलेच पाहिजे म्हणून सूचित झाले आहे.

विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सतीश जगताप म्हणतात की या बाबत स्पष्ट शासन निर्देश आधीच निघाले आहे. त्याचा अंमल व्हावा म्हणून राज्य प्राथमिक शिक्षण सहसंचालक रमाकांत कोठारे यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांस व्हिसी व मेलवर परत सूचित केले आहे. या बाबतचा जिल्हानिहाय अहवाल उपसंचालक यांना सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र तसे अहवाल शिक्षण संचालक कार्यालयास प्राप्त झालेले नाही. म्हणून प्रत्येक विभागातील जिल्हानिहाय माहिती एकत्रित करीत नमुद पत्रात सादर करण्याचे निर्देश आले आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हणून घोषित झाल्यानंतर ते गायल्या गेले पाहिजे म्हणून शाळा पातळीवर विशेष आग्रही भूमिका घेण्यात आली होती. तसे निर्देश मात्र अंमलात आले नसल्याची स्थिती स्पष्ट झाली आहे.