वर्धा : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगरपरिषदेने राज्यात पहिल्यांदाच ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॅायलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गमय परिसरात अगदी दोनशे स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे.
हेही वाचा : अमरावतीत २ हजार ६४६ अंगणवाडी केंद्र बंदच, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर महिना उलटूनही तोडगा नाही
यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी दोन पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, पुरुषांकरीता करिता एक मुत्रीघर, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सेनिटरी वेंडींग मशीन या प्रकारच्या अत्याधुनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.
हेही वाचा : वर्धा : अधिकाऱ्यासह दहा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, ‘हे’ आहे कारण
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन हिंगणघाट शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर उपलब्ध असलेल्या आसनावर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली असून शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांचा पुढाकार राहला आहे.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, या उपक्रमाची शासनाने दखल घेतली असून जिल्ह्यात अन्य ठिकाणी पण असे टॉयलेट उभे करू.