वर्धा : सरकारी नौकरी मिळावी हीच कोणत्याही शिक्षित विद्यार्थी इच्छा बाळगून असतो. दहावी ते पदवी तसेच विविध तंत्र शाखेत अश्या नोकऱ्या केव्हा उपलब्ध होतात, याची चातकासारखी वाट इच्छुक बघत असतात. आता महापारेषण या विद्युत कंपनीने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी सुपरिचित आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांच्या शेकडो जागा रिक्त दाखवून त्या भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कंपनीने विविध २६० जागा भरण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देण्याची प्रक्रिया सूरू झाली आहे. पात्र बेरोजगार युवकांनी राज्य विद्युत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. त्याची अंतिम मुदत ३ एप्रिल २०२५ अशी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत अमरावती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पूणे, वाशी अश्या सात परिमंडळ कार्यालय तसेच एरोली येथे राज्य भार प्रेशण केंद्र आहेत. त्यापैकी सात परिमंडळ कार्यालयच्या अधिकार क्षेत्रात वेगळी मंडळ कार्यालये आहेत. त्या अंतर्गत येणाऱ्या वेतन गट तीन च्या मंडळ स्तरीय सेवा ज्येष्ठतील निम्नस्तर लिपिक ( वित्त व लेखा ) ही रिक्त पदे एकत्रित करून सरळ सेवेद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या विशेष भरती मोहिमेत २६० रिक्त पदे भरल्या जातील.
या भरतीसाठी १५० गुणांची ऑनलाईन परीक्षा विविध केंद्रावर घेतल्या जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील पात्र इच्छकांना ६०० तर अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुकास ३०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. भरती अनुषंगाने अधिक माहिती महापारेषण अधिकृत वेबसाईट येथे उपलब्ध आहे.अधिकृत संकेतस्थळ असे आहे. एचटीटीपी / डब्लूडब्लूडब्लू डॉट महाट्रान्स्को डॉट इन, या संकेतस्थलावर अर्ज अपेक्षित शुल्कसह दाखल करायचे आहेत. या पदासाठी शैक्षणिक अहर्ता वाणिज्य शाखेतील बी. कॉम. ही पदवी व एमएस – सीआयटी परीक्षा उत्तीर्ण अशी आहे. अनुभवाची गरज नाही. मात्र ३ एप्रिल पर्यंत संबंधित पात्रता संपादित केली असणे आवश्यक आहे. किमान वय १८ व कमाल ३८ असावे. सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इच्छुकांना कमाल वयोमर्यादा ही पाच वर्षांनी शिथिल राहणार. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असा असणार. दिव्यांग इच्छुकांना ४५ वयोमर्यादा आहे.