वर्धा: पीपल फॉर एनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम या वन्यजीव बचाव केंद्रा मार्फत राबविण्यात येत असलेले विविध वन्यजीव संवर्धन प्रकल्प कार्यरत आहे. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतुन वाचविण्यात आलेले वन्य प्राण्यांची शुश्रुषा करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर शासना तर्फे वन्यजीव संवर्धनासाठी होत असलेल्या विविध प्रयत्नांचा एक भाग म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्प व पीपल फॉर एनिमल्स, वन्यजीव बचाव केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बोर व्याघ्रप्रकल्पाच्या विविध गवताळ भागात काळविटांचे वास्तव्य व संख्या या बाबत पाहणी करण्यात आली असता त्याठिकाणी संख्या वाढवि याकरिता पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्रातील विविध भागातून वनविभागा मार्फत वाचविण्यात आलेल्या काळविटांची योग्य शुश्रूषा करून व त्यांची योग्य आरोग्य तपासणी करून त्यांच्या योग्य वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बोर व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षित गवताळ प्रदेशात मुक्त करण्यात आले. यामध्ये मुख्यतः५ काळवीटांना, ४ मादी व एक नर, दोन अजगरांना असे एकुन ७ वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बोर मधील काळवीट संवर्धन अभियाना अंतर्गत काळविटांच्या संख्येत वाढ झाल्यास भविष्यात बोर व्याघ्र प्रकल्पात जैववविविधात बहरण्यात मदत होईल व सदर अभियान हे वन्यजीव प्रेमींकरिता वन्यजीव अभ्यास या दृष्टिकोनातून दिलासा देणारी बाब आहे. सदर प्रकल्प हा बोर व्याघ्रप्रकल्पाचे संचालक मंगेश ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, हिंगणी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी अभय तलहन,पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्राचे संचालक आशिष गोस्वामी, वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे पशुचिकित्सक डॉ. रोहित थोटा, क्षेत्रसहायक श्री खेलकर वनरक्षक अतुल अखंडे, काळे, ऋषिकेश गोडसे, अभिषेक खेडुलकर व देवर्षी बोबडे उपस्थित होते.

हेही वाचा : वर्धा: हिट अँड रन प्रकरणात एकास अटक, एक अल्पवयीन फरार

काळवीट

काळवीट किंवा कृष्णमृग हा एक देखणा आणि अस्सल भारतीय प्राणी आहे. काळवीट कळपाने राहणारा प्राणी असून एका कळपात १० ते ३० काळवीट असतात. याला वन्यजीव अधिनियम १९७२च्या अनुसूची एक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गवताळ व खुरटी झुडपे असलेल्या क्षेत्रात प्रामुख्याने काळवीटांचे अस्तित्त्व आढळते. काळवीट घनदाट तसेच डोंगराळ जंगलात राहण्याचे टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. नराची लांबी १२० ते १३० से.मी व ऊंची,खांद्याजवळ ८० सें.मी आढळते. मादी नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगे नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणे पांढरट असतो. नरांना पीळदार आणि डौलदार शिंगे असतात. काळवीट हा जगातील एक वेगाने धावणारा प्राणी असून तो ताशी १०० कि.मी. वेगाने धावू शकतो.