वर्धा : आज निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असतानाच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले व आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांना चांगलाच चोप बसला. सोशल माध्यमावर वऱ्हाडी बोलीने कराळे यांनी चांगलीच लोकप्रियता कमावली. पण आजच्या घटनेत त्यांनाच बदडण्यात आल्याने तेच या माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. झाले असे की कराळे हे मांडवा या आपल्या गावी मतदान करून वर्धेकडे परत येत होते.
समोरच उमरी हे गाव आहे. तिथे त्यांनी मतदान केंद्राची पाहणी सूरू केली. भाजपचे बूथ नियमबाह्य असल्याचा दावा करीत त्यांनी बूथवर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांशी वाद घातला. तसेच रागावले, असे ऐकायला मिळाले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते असलेले उमरीचे माजी सरपंच सचिन खोसे यांना बोलावून घेतले.
हेही वाचा…बुलढाण्यात मतदान उत्साहात; ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्क्यांपेक्षा जास्त…
कराळे यांचे काही बोल खोसे यांना मनाला लागल्याने त्यांनी थेट कराळे यांना पकडून चांगलेच चोपले. तेव्हा काही स्थानिक मंडळींनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. या घटनेने कराळे चांगलेच हादरून गेल्याचे गावकरी सांगतात. याप्रकरणी दोन्ही गट सावंगी पोलीस ठाण्यात पोहचले आहे. कराळे या संदर्भात बोलतांना म्हणाले की हा गुंडगिरीचा प्रकार आहे. मी उमरी गावातून जात असतांना काँग्रेसच्या बूथवर थांबलो. तेव्हा कार्यकर्त्यांनी भाजप बूथवर नियमापेक्षा अधिक लोकं लॅपटॉप घेऊन बसले असल्याचे सांगितले. तेव्हा सचिन खोसे हा माझा काहीही दोष नसतांना मारायला धावला. मला व माझ्या मुलीला पण मार बसला.
हेही वाचा…नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा… काँग्रेसचे कार्यकर्ते…
हे असे गुंडगिरीचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही. तर खोसे गटाने स्पष्ट केले की मास्टरला नको तिथे नाक खुपसायची सवय आहे. सर्व शांततेत सूरू असतांना याने वाद घालणे सूरू केले. जर चुकीचे असते तर प्रशासनाने ते बंद पाडले असते. पण सर्व काही मलाच समजते, या गुर्मीत नेहमी राहणाऱ्या आम्ही कां ऐकून घ्यावे म्हणून समजावले, असे खोसे गटाने स्पष्ट केले आहे. प्रकरण झाल्यावर भाजप व काँग्रेसीचे वरिष्ठ नेते घटनास्थळी पोहचले. समजूत काढण्यात आली.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले की हा केवळ दोन व्यक्तीतील वाद आहे. दोन्ही गट पोलीस ठाण्यात आले असून त्यांच्या तक्रारी नोंदवून घेणे सूरू आहे. बाकी मतदान प्रक्रिया नियमित सूरू असल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले.