वर्धा : कार्तिक यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र कौडण्यपुर येथे विदर्भभरातून भाविकांची गर्दी उसळते. विविध भागातून येथे दिंड्या येतात. उद्या मंगळवारी दही हंडी आयोजित होईल.असे सांगतात की हे क्षेत्र चारही युगात अस्तित्व राखून असलेले पुरातन नगर आहे. मात्र रुक्मिणीचा संदर्भ चिरपरिचित आहे. भगवान श्रीकृष्णाने याच नगरीतील अंबिका मंदिरातून रुक्मिणीचे हरण केल्याची पुराणात आख्यायिका आहे. दमयंतीचे हेच माहेर तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभू रामाची भक्त शबरी हिचे जन्मस्थान हेच असल्याचा दाखला आहे.
हेही वाचा : अवकाळी तांडव! बुलढाण्यात रात्रभर संततधार, गारपीट अन् सोसाट्याचा वारा; शेकडो गावे अंधारात
संत अच्युत महाराज यांची ही तपोभूमी आहे. त्यांनीच येथील शिव भवनाचा जीर्णोद्धार केला. या मंदिरात जमिनीच्या तीस फूट खाली , त्यावर पंधरा फुटावर व जमिनीवर असे तीन शिवलिंग असल्याचे दिवे ट्रस्टचे सुधीर दिवे सांगतात. कार्तिकी यात्रे निमित्त विठल रुखमाई या ठिकाणी अडीच दिवस वास्तव्यास असतात, अशी श्रद्धा आहे. म्हणून दूरवरून वारकऱ्यांच्या दिंडी पौर्णिमेस कुऱ्हा येथे येवून रिंगण करीत कौडण्यपूरला कूच करतात. त्यांची वास्तव्य व भोजनाची व्यवस्था वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे केल्या जाते. विदर्भाचे पंढरपूर म्हणून या क्षेत्राची ओळख झाली आहे.दिंडीत सहभागी वारकऱ्यांचे स्वागत देवणाथ मठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत होईल.