वर्धा : ऐन पावसाळ्यात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा सुरू झालेला वावर नागरिकांमध्ये भीती निर्माण करीत आहे, तर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज पहाटेच्या सुमारास वर्धा नागपूर-महामार्गावर बिबट येऊन गेल्याचे वृत्त आहे. ते खरं असल्याचे वन अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यास पकडण्यासाठी चमू गेली असल्याचे सहाय्यक वन संरक्षक पवार यांनी सांगितले. सकाळी फिरायला जाणाऱ्या काहींनी त्यास पाहिल्याचे ऐकायला मिळते. तर याच मार्गावर हॉटेल हाय व्हयू समोर या बिबट्याचे ठसे दिसल्याची पुष्टी वन खात्याने केली. त्यामुळे या मार्गावर नेहमी दिसणारी वाहतूक चांगलीच रोडावली आहे. हा बिबट बोर प्रकल्प येथून भटकंती करीत आला असावा, अशी शक्यता व्यक्त होते. काही वर्षांपूर्वी एका वाघाने याच मार्गावरील हिंदी विद्यापीठात संचार केला होता.
दुसरीकडे, उमरेड येथून आलेला पाहुणा वाघ शिकारीवर शिकार करीत आहे. हिंगणघाट शहरालगत त्याचा हल्ली मुक्काम आहे. या पार्श्वभूमीर वन खात्याचे सर्व वरिष्ठ तिथे पोहचले असून पकडण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर घटनास्थळी हजर झाले आहे. वाघ असलेल्या परिसरात सततच्या पावसाने खूप चिखल साचला आहे. त्यामुळे रेस्कयू ऑपेरेशन करण्यास अडथळे येत असल्याचे चित्र आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघास जेरबंद करण्याचे आदेश पूर्वीच दिले आहेत. परिसरातील काही गावात या वाघाने अनेक जनावरे फस्त केली. तसेच शेती कामे ठप्प पडल्याने लोकांनी ओरड सूरू केल्यावर आमदार समीर कुणावार यांनी वन मंत्र्यांकडे धाव घेतली होती.
हेही वाचा : विदर्भातील दोन संशोधकांना राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
१० जुलै पासून हा वाघ हिंगणघाट परिसरात फिरत आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या पाहुण्या वाघाने आडोसा शोधत मुक्त भटकंती केल्याचे म्हटल्या गेले. बैल, गायी, वासरे, रोही, रानडुकरे अश्या प्राण्यांवर त्याने ताव मारला. तसेच गत दोन तीन दिवसापासून वाघाने हिंगणघाट शहरालगत मुक्काम हलविल्याने वन खाते घायकुतीस आले. मात्र आज त्यास पकडण्याचे सर्व ते प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकारी सांगतात. जिल्ह्यातील असणाऱ्या १२ वाघापेक्षा हा पाहुणा जरा ज्यास्तच हैदोस करीत असल्याची प्रतिक्रिया आहे.
वर्ध्यात बिबट, तर हिंगणघाटात वाघाचा वावर, नागरिक भयभीत अन् वनविभाग घायकुतीस, असे चित्र वर्धा जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
© The Indian Express (P) Ltd