वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना परत हॅट्रिकने हुलकावणी दिले आहे. राजकारणात मी नशिबाने मिळविले, असे तडस उघड बोलत असतात. त्याला कारण पण आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या तडस यांनी कसेबसे शिक्षण घेत व्यायामावर लक्ष केंद्रित करीत तीन वेळा विदर्भ केसरी ‘किताब जिंकण्यापर्यंत मजलं मारली. त्यानंतर सहकार महर्षी बापूरावजी देशमुख यांनी त्यांना बाजार समितीचे संचालक करीत सार्वजनिक जीवनात आणले. पुढे ते नगरसेवक झाले.
१९९२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत अपक्ष उभे राहून शरद पवार यांचे उमेदवार अरविंद पोरेडडीवर यांना पराभूत करीत आमदार झाले. १९९८ मध्ये दत्ता मेघे यांनी पवार यांच्या सूचनेने त्यांना तिकीट देत आमदार केले.
मात्र तिसऱ्या वेळी ते पडले. या दरम्यान ते दोन वेळा देवळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले. तिसऱ्यांदा अयशस्वी झाले. आताही दोन वेळा खासदार झालेच होते. तिसऱ्या वेळी त्यांनी तिकीट आणण्यात यश मिळविले. पण हॅट्रिक करू शकले नाही. हा नशिबाचाच भाग, असा सुस्कारा त्याचे सहकारी सोडतात.