वर्धा : महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज रात्री हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली. या सभेचे मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच होते. मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित शरद पवार यांना नऊचे विमान नागपुरातून पकडायचे होते. त्यामुळे प्रथम त्यांचे नंतर अमर काळे यांचे व मग ठाकरे यांचे भाषण असा क्रम ठरला. मात्र, पुढे काहीच हातात नसल्यासारखे सगळे विस्कटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपचे नेते संजय सिंग नियोजित वेळेत हजर असताना सभेत भाषणे देण्याची हौस भागवून घेण्याची चढाओढ लागली. काही भाषणे झाल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भाषण सुरू झाले. नको तो इतिहास ते उगाळत असल्याची चर्चा पत्रकार कक्षात सुरू झाली. शेवटी त्यांना आवरते घेण्याची सूचना झाली. पण मोह आवरेना. तेवढ्यात शरद पवार यांनी खुद्द थांबण्याचे सूचवले. त्यांनी थोडक्यात बोलणार असल्याचे स्पष्ट करीत काही विचार मांडले. लगेच निघालेही. अमर काळे यांनी प्रभावी भाषण सुरू केले. त्यातही स्टेजवरील राष्ट्रवादीचा एक फिरता नेता पक्षप्रवेश, पाठिंबा वैगेरे सांगत व्यत्यय आणत असल्याचे चित्र होते.

हेही वाचा : “महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”

सभेचे आकर्षण असलेले उद्धव ठाकरे केव्हा बोलणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता वाढीस लागली होती. त्यांचीही निघण्याची वेळ होत असल्याचे निदर्शनास आणण्यात आल्यावर काळे यांना सूचना झाली ती थांबण्याची. पण हीच सूचना चुकीची ठरली. कारण ठाकरे हे वॉशरूमला जाऊन येतो असे बोलले आणि तोपर्यंत काळे बोलतील, असे ठरले. मात्र, काळे यांनी थांबण्यास सांगितल्याचा निरोप ऐकला आणि सारंच बारगळले. गोंधळ उडाला. ठाकरे माईकजवळ जाऊन काळे यांना चालू द्या म्हणून विनंती करीत होते, तर काळे त्यांना बोलण्याची विनंती करीत होते. त्यात सगळेच मग ठाकरे यांना बोलण्याची विनंती करू लागले. ठाकरे मात्र काळे यांनाच बोलू द्या, असे समजावत होते. शेवटी ठाकरे यांनी जाहीरपणे आवाहन केले की, मी आता पाच मिनिटेच बोलतो पण माझे झाल्यावर अमर काळे पुन्हा बोलतील, अशी खात्री द्या. मग थोडक्यात भाषण आटोपते घेत उद्धव ठाकरे निघाले. हा प्रकार उपस्थित शिवसेनाप्रेमिंना मात्र आवडला नाहीच.

हेही वाचा : शरद पवार नागपूरच्या मतदानाबाबत अमरावतीच्या सभेत काय म्हणाले ?

स्टेजवर उपस्थित सुधीर कोठारी म्हणाले की, सभा अत्यंत यशस्वी झाली, तर शिवसेना नेते रवी बालपांडे यांनी थोडा हिरमोड झाल्याचे मान्य केले. उद्धव ठाकरे एक तास बोलणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे ते वेळेपूर्वी दाखलही झाले. मात्र काही उत्साही नेत्यांनी त्यावर विरजण टाकलेच. यांस जबाबदार कोण, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha lok sabha uddhav thackeray s speech for mahavikas aghadi candidate amar kale pmd 64 css