वर्धा : सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ् डॉक्टरांनी विविध शास्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. पण या प्रकरणात अफलातून यश प्राप्त केले. धारदार काचेमुळे हाताच्या नसा पूर्णतः कापल्या गेल्याने तरुणाचा हात कापण्याशिवाय पर्याय नसताना केवळ मायक्रोव्हस्क्युलर प्लास्टिक सर्जरीव्दारे रुग्णाला अपंगत्वापासून वाचविणारी शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात झाली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी शांती चोटपेल्लीवार (३५) हा दुकानात साफसफाई करत असताना अचानक काच फुटून त्या काचेचा मोठा तुकडा त्याच्या उजव्या हातात घुसला. त्या धारदार काचेमुळे शांतीच्या हाताच्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत गेला. या आकस्मिक प्रसंगामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले.
पांढरकवडा येथील माजी नगराध्यक्ष नहाने व सामाजिक कार्यकर्ते सोनू उप्पलवार यांनी चोटपेल्लीवार कुटुंबियांची भेट घेऊन तातडीने सावंगी (मेघे) रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. चोटपेल्लीवार परिवाराने वेळ न दवडता शांतीला सावंगीच्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात प्लास्टिक सर्जन डॉ. फिरोज बोरले यांनी रुग्णतपासणी केली असता उजव्या हाताच्या पुढील भागाला गंभीर इजा होऊन हाताचे स्नायू, रक्तवाहिन्या, मज्जातंतू व अन्य नसा पूर्णपणे कापल्या गेल्याचे दिसून आले. स्नायू व सर्व वाहिन्यांची व्यवस्थित दुरुस्ती न केल्यास हात शरीरापासून विलग करणे अपरिहार्य झाले होते. अशा गंभीर अवस्थेत तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. फिरोज बोरले यांनी घेतला. बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अमोल सिंगम व डॉ. आदिती गहुकार यांच्या मदतीने डॉ. बोरले यांनी मायक्रोव्हस्क्युलर प्लास्टिक सर्जरी करून हाताची पुनर्रचना यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली. रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ही शस्त्रकिया यशस्वीरित्या करता आली. अन्यथा, रुग्णाचा हात कापण्याशिवाय पर्याय नव्हता, असे मत डॉ. फिरोज बोरले यांनी व्यक्त केले.
विदर्भात केवळ सावंगी रुग्णालयात ही सुविधा
ही शस्त्रकिया राज्यात मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असून अतिखर्चिक आहे. विदर्भातील कोणत्याही रुग्णालयात ही सेवा उपलब्ध नाही. मायक्रोव्हस्क्युलर प्लास्टिक सर्जरीचे प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञच ही शस्त्रक्रिया करू शकतात. आज सावंगी मेघे रुग्णालयात ही सेवा सहजपणे उपलब्ध असल्याने फारसा खर्चही रुग्णपरिवाराला लागला नाही आणि कमी वेळेत रूग्ण सुखरूपणे आपल्या घरी पोचला, असे डॉ. बोरले यांनी सांगितले.