वर्धा : गृह राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. पंकज भोयर यांचे रविवारी वर्ध्यात प्रथम आगमन झाले. या प्रथम आगमनाची संधी साधून विविध लहान मोठ्या १७५ संघटनांनी डॉ. भोयर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यात चमकदार भाषण झाले ते माजी खासदार रामदास तडस यांचे. ते म्हणाले की, हा अतिशय लक्षात राहणारा सत्कार मी पाहतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटना सत्कार करण्यास एकत्र झाल्या. याच संघटना माझ्या पाठीशी उभ्या असत्या तर मी नक्कीच निवडून आलो असतो, असा त्यांचा टोला हास्याची दाद घेऊन गेला. पुढे ते म्हणाले की, डॉ. भोयर हे संयमी आहेत. कमी बोलणारे आहेत. राजकारणात यशस्वी होण्यासाठी हा महत्वाचा गुण ठरतो. तडस यांनी एक अनोखा संयोग सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू असलेले अमित शहा हे गृह व सहकार खाते सांभाळतात. येथे डॉ. भोयर हेसुद्धा ही दोन्ही खाती सांभाळणार. त्यामुळे पुढे काही सांगायला नको, असे तडस यांनी म्हणताच टाळ्यांचा गडगडाट झाला. सत्कारमूर्ती डॉ. पंकज भोयर यांनी मग आपल्या भाषणातून तडस यांच्या प्रशंसेची परतफेड केली. तडस यांना राज्य शासन कोणती संधी देवू शकते, याकडे लक्ष देऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर

आमदार राजेश बकाने यांनी भोयर यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे म्हणाले की, भोयर यांचे वय अवघे ४७ वर्षांचे आहे. त्यांना भरपूर राजकीय काम करण्याची संधी आहे. त्यांनी केवळ वर्धा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात छाप सोडावी. डॉ. भोयर आपल्या भाषणातून म्हणाले की, जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार. माझा युवक नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा, असा प्रयत्न करणार. देशात रामराज्य स्थापन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू महाराष्ट्रात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार, अशी ग्वाही डॉ. भोयर यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे व अन्य उपस्थित होते.एक आयोजक प्रदीप बजाज म्हणाले की, अगदी वेळेवर सर्व संघटना एकत्र आल्या, हे कार्यक्रमाचे यशच. नामदार भोयर यांच्या वर्धा प्रवेशावेळी सीमेवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. सत्कारस्थळी सोशलिस्ट चौकात भव्य हार क्रेन द्वारा पाहुण्यांना घालण्यात आला. यावेळी वर्धेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha minister pankaj bhoyar on vidhan sabha election 2024 support from sanghatana and parties pmd 64 css