वर्धा : मायलोमेनिंगोसेल या जन्मतः निर्माण होणाऱ्या दुर्धर व्याधीमुळे अनेक शारीरिक अडचणी निर्माण झालेल्या आणि सर्वसामान्यांसारखे जगणे अशक्य असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणीला तिचे जगणे सुखकर करणारी शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभागात करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील माऊली जहांगीर येथील निवासी राखी रमेश भोने (वय २६) ही दुर्धर आजारामुळे बालपणापासूनच त्रस्त होती. आजारावर लहानपणी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला यश न आल्यामुळे पुढे त्रास वाढत गेला. चालताना तोल जाणे, मूत्रविसर्जनावर नियंत्रण नसणे, सततची कंबरदुखी आदी दुखण्यांमध्ये सतत वाढ होत असताना अमरावती जिल्ह्यातील रुग्णसेवक व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी राखीला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला तिच्या वडिलांना दिला.
हेही वाचा : भाजपच्या महिला मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर?
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राखीला सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले व संपूर्ण तपासण्या करण्यात आल्या. मायलोमेनिंगोसेलमुळे रुग्ण व्याधिग्रस्त असल्याचे निदान झाल्यावर न्यूरोसर्जन डॉ. संदीप इरटवार, डॉ. जितेंद्र ताडघरे यांनी पाठीच्या कण्याच्या हाडावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे राखीच्या आयुष्याला नवी उभारी मिळाली असून रुग्णाच्या चालण्यात झपाट्याने सुधारणा होत असल्याचे डॉ. इरटवार यांनी सांगितले. दीर्घकाळ असलेली कंबरदुखीही कमी झाली असून लघवी करताना होणार त्रास जवळपास थांबला आहे, असे राखीने सांगितले. संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्वरित आर्थिक मदत मंजूर करवून घेतली आणि या आजारावरील उपचार महागडे असल्याने चिंतीत असणारे राखीचे वडील रमेश भोनेही चिंतामुक्त झाले. रुग्णाला व्याधीमुक्त करीत नवजीवन देणाऱ्या या आरोग्यदायी प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच रुग्णपरिवाराने आभार मानले.