वर्धा : पक्ष्यांच्या नोंदणी करण्यात वर्धा जिल्ह्याने आघाडी घेतली असून एकूण ३०४ पक्ष्यांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. येथील ऑक्सिजन पार्कमध्ये पक्षीवैभव सूचीचे लोकार्पण जिल्हा वनविभाग व वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या आयोजनास संपन्न झाली. प्रामुख्याने वनविभाग पक्ष्यांची नोंद ठेवत असते. मात्र येथील पर्यावरणप्रेमी संस्था बहार नेचर फांउडेशनने वनविभागास सहकार्य करतांनाच स्वत: पुढाकार घेत नोंद करतांनाच पक्षीसूचीही तयार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लोकार्पणप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की पक्षी हा जैवविविधतेचा अविभाज्य घटक आहे. परागीकरण तसेच जंगलांच्या नैसर्गिक निर्मितीसाठी पक्षी सृजनाची भूमिका बजावत आहे. बहार संस्थेने पर्यटकांसाठी हा मोलाचा ठेवा जतन केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. बहारचे अध्यक्ष प्रा.किशोर वानखेडे यांनी सांगितले की सुधारीत पक्षीसूचीत जिल्ह्यातील पाणवठे, मोठे तलाव, धरणे, माळरान, उद्याने, टेकड्या, झुडपी जंगल, व्याघ्र प्रकल्प, मानवी वस्ती आदी विविध प्रकारच्या अधिवासात ३०४ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. मंचचे डॉ.सचिन पावडे यांनी वृक्ष आणि पक्षी यांचा सहसंबंध आपल्या भाषणातून मांडला. सन साजरे करतांना सजीवसृष्टीला बाधा पोहचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. तसेच वारब्लर हा नवा पक्षी दिसून आल्याचे सांगितले.

हेही वाचा : आशा वर्करकडून काळी दिवाळी साजरी; वेतन न झाल्याने रात्रभर आंदोलन

डॉ.बाबाजी घेवडे यांनी पक्ष्यांची ओळख, पर्यावरण महत्त्व, स्थलांतरण याबाबत विज्ञाननिष्ठ माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली. सरपंच वैशाली गौळकर, वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी भूमिका मांडली. याप्रसंगी मार्गदर्शक अतुल शर्मा, जयंत सबाने, डॉ.आरती प्रांजळे, राजदिप राठोड, पवन दरणे, संगीता इंगळे, याकुब शेख, वेदांत गुढेकर, आकाश जयस्वाल, प्रतिक्षा गेटमे, शर्वरी मुळे, श्याम भेंडे यांनी आयोजनास सहकार्य दिले. सर्व उपस्थितांना पक्षीसूची भेट देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha new warbler bird found during the preparation of bird list pmd 64 css