वर्धा : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कोण कुणीकडे, याची चर्चा संपता संपत नाही. काही ठाकरे गटाशी जुळून राहिले. आम्ही ठाकरेंसोबत असे म्हणणारे मात्र आता एका नियुक्तीने चकित झाले आहे. समाजिक चळवळीतून पुढे आलेले निहाल पांडे यांची नियुक्ती पक्षाचे वर्धा विधानसभा क्षेत्र प्रभारी म्हणून करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी अधिकृत शिवबंधन बांधले.
कोण आहेत निहाल पांडे?
ही नियुक्ती जुन्या शिवसैनिकांसाठी आश्चर्याची ठरत आहे. कारण पांडे हे सेनेच्या मुख्य प्रहावासोबत कधीच नव्हते. मात्र अलीकडे त्यांनी ठाकरे समर्थनार्थ खुली भूमिका घेतली होती. तसेच ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसविणारच, असा निर्धार करीत त्यांनी वर्धा ते मातोश्री अशी यात्रा काढली होती. वर्धा विधानसभा क्षेत्राची बांधणी नव्याने करणार. शेकडो लोकांचा प्रवेश आपल्या नेतृत्वात लवकरच होईल, असे पांडे म्हणाले.
हेही वाचा : चित्रा वाघ म्हणतात, “निवडणुकीसाठी अन्य राजकीय पक्षांना महिला उमेदवार…”
पांडे यांनी विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. ग्रामीण घरपट्टी, महिला बचत गट, शेतकरी प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. आता हा प्रवास राजकीय क्षेत्रात त्यांना किती फलदायी ठरतो, हे पुढेच दिसेल. सध्या ठाकरे गटाचे बाळू मिरापूरकर व आशीष पांडे हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. तसेच माजी जिल्हाप्रमुख व जुने निष्ठावंत रविकांत बालपांडे यांच्याकडे सह संपर्कप्रमुख् म्हणून जबाबदारी आहे. या तीनही गटाशी पांडे यांचा संबंध नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती चकित करणारी ठरत आहे.