वर्धा: मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या संपूर्ण राज्याची चिंता ठरत आहे. कॉन्व्हेंट संस्कृती आता खेडोपाडी पोहचत आहे. परिणामी या शाळा ओस पडू लागत आहे. पटसंख्या घसरली की पुढचे संकट शिक्षक संख्या कमी होण्याचे. निमशहरी गावातील पालिकेच्या शाळेत तर अधिक चिंतादायी स्थिती असल्याचे चित्र आहे. पालिकेचा कारभार आणि शिक्षकांवर सर्व भार. त्यात अनियमित होणारा पगार. त्यामुळे या पालिका शाळा बंद होण्याच्या मार्गावर असतांना एका गावात मात्र पटसंख्या कॉन्व्हेंटच्या नाकावर टिच्चून कायम आहे. नव्हे तर वाढत आहे. परिणामी शिक्षक संख्या वाढवून दिल्या जात आहे. एका महिला शिक्षकाची ही कमाल आहे.
वर्धा जिल्यातील आर्वी येथील शिवाजी शाळेत पटसंख्येची कमाल कौतुकास्पद म्हणावी लागेल.आजच्या युगात महिला कुठेही मागे नाही व शासनाने शासनाने राबविलेल्या विविध धोरणामुळे महिलांच्या कार्यास बळकटी मिळत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे या ‘ पीएम श्री ‘ शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा चौधरी या होत. शाळेला २०२३ मध्ये पीएम श्री मध्ये समाविष्ट करण्यात आले हा मोठाच गौरव.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने आमदार जोरगेवार नाराज
२०१२ मध्ये पद्मा मॅडमनी शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यभार आपल्या खांद्यावर घेतला. त्यावेळी शाळेत त्या एकट्याच शिक्षिका होत्या व त्यांना यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी पद्मा चौधरी यांनी पालक सभा घेऊन आपल्या अडचणी पालकांसमोर मांडल्या व नगरपरिषद कडे सहाय्यक शिक्षकाची मागणी केली. त्यांच्या मागणीला मान देऊन नगरपरिषदेने एक सहाय्यक शिक्षक शाळेला उपलब्ध करून दिले.
त्यावेळी २०१२ मध्ये शाळेची पटसंख्या मात्र ४७ इतकी होती.पद्मा चौधरी यांनी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी पालकांचा सहभाग नोंदविला व सर्व उपक्रम पालकांपर्यंत पोहोचविला.परिसरातील पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली व त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेच्या ऐवजी नगर परिषद च्या शाळेत दाखल करणे पसंत केले व हळूहळू आज या शाळेची पटसंख्या ११८ इतकी येऊन पोहोचलेली आहे.
हेही वाचा : सावधान! मूत्रपिंडाला सौंदर्य प्रसाधन क्रीममुळे धोका !
मुख्याध्यापक पद्मा चौधरी सांगतात की सुरुवातीला शाळेचा परिसर अत्यंत घाणेरडा होता. परिसरातील लोक आपल्या घरातील कचरा शालेय परिसरात आणून टाकायचे. काही लोक मद्य पिऊन शाळेच्या परिसरात दिसायचे.जुगार खेळायचे. परिसरातील लोकांना विनंती करून व नगरपरिषद च्या साह्याने या गोष्टींवर मात केली व आज शालेय परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. आज शाळेत तीन महिला शिक्षीकांसोबत एक शिक्षक कार्यरत आहे.आज ही शाळा वर्धा जिल्ह्यातील वर्ग १ ते ४ च्या प्राथमिक शाळांमध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळखले जाते.