वर्धा : काँग्रेस हा देशातील भ्रष्ट व बेइमान पक्ष असून देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंबही याच पक्षाचे शाही कुटुंब आहे. ज्या पक्षात आस्था असेल ते गणपती पूजेला विरोध करणार नाहीत. पण आजच्या काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली. देशभक्तीचा आत्मा हरवलेल्या काँग्रेसला ‘तुकडे तुकडे टोळी ’ व ‘शहरी नक्षलवादी चालवत आहे,’ असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा शुक्रवारी येथील स्वावलंबी मैदानावर पार पडला. या कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यींना मार्गदर्शन करताना तसेच विविध योजनांचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली. मात्र दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय या घटकांना कधीच पुढे जाऊ दिले नाही, त्यांची सातत्याने उपेक्षा केली. खोटारडेपणा, फसवणूक, बेईमानी हेच काँग्रेसचे तत्त्व आहे. परदेशात जाऊन देशाला तोडण्याची भाषा काँग्रेस करीत आहे. देशात सर्वांत भ्रष्ट परिवार कोणता असेल तर तो काँग्रेसचा शाही परिवार आहे, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी गांधी कुटुंबावर केली.

काँग्रेसला आमच्या श्रद्धेप्रती आस्था नाही. गणपती पूजेला विरोध केला जातो. गणपती पूजेविषयी त्यांच्यात चीड आहे. कर्नाटकात तर गणपती मूर्तीलाच कारागृहात टाकले. महाराष्ट्रात गणपतीची आराधना केली जात होती, तेेव्हा कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस वाहनात होती. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करते, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

हेही वाचा :सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात वृद्धावर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

‘पीएम मित्रा मेगा टेक्स्टाइल पार्क’ची पायाभरणी

अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील ‘पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क’ या वस्त्रोद्याोग उद्यानाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. याच कार्यक्रमातून त्यांनी वस्त्रोद्याोग उद्यानाचे ई-भूमिपूजन केले. पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क ही वस्त्रोद्याोग क्षेत्रात क्रांती आणणारी योजना आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.