वर्धा : विनयभंग केला म्हणून चार दिवसांपूर्वी एका महिला पोलीस शिपायाने रामनगर पोलीसांकडे तक्रार केली होती. काही महिला व त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी आपल्यास मारहाण केल्याचा आरोपही सदर महिलेने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता हे प्रकरण चोराच्या उलट्या बोंबा तर ठरणार नाही ना, असे चित्र पुढे येत आहे. महिला शिपायाने ज्यांच्यावर आरोप केला त्यांनी आता पोलीस अधीक्षकांना निवेदन देत बाजू मांडली आहे. त्यात आरोप करण्यात आलेल्या शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश राऊत यांनी आपली बाजू मांडली.
ते म्हणतात की सदर महिला पोलिस शिपायाने खोटे आरोप केले आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून विविध मागण्या करण्याचा आरोप करणाऱ्या याच महिलेने अश्लील व्हिडिओ आम्हास पाठविला होता. तो व्हिडिओ परत तिला दाखविला तेव्हा तिने माफी मागितली. तसेच यापुढे कोणत्याही महिलेचे शोषण करणार नाही, असे शपथ पत्रावर लिहून दिल्याचे निवेदनात नमूद आहे. उलट मी पोलीस असल्याने माझे कोणीच काही वाकडे करू शकणार नाही, अशी धमकी दिली. उलट या महिला शिपायाने स्वतःस सुरक्षित ठेवण्यासाठी रामनगर पोलीसांना घडलेला खरा प्रकार न सांगता बनाव केला. आमच्यावरच आरोप केले.
हेही वाचा : धक्कादायक! पतंगाच्या मांजाऐवजी पकडली वीज तार… मग झाले असे की…
या महिला शिपायास खोटे आरोप करण्याची सवयच आहे. नागपूरला असताना तिने एका शिपायावर असाच खोटा आळ घेतला होता. अश्या शिपायास सेवेत ठेवणे चुकीचे असून ही बाब महिलांसाठी घातक असल्याचा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे. आम्ही शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत समाज व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. या आरोप प्रत्यारोपांनी चांगलीच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खुद्द महिला पोलीस शिपाई या वादाच्या केंद्रस्थानी असल्याने सर्वत्र उत्सुकता आहे.