वर्धा : जिल्हा गृहरक्षक दलातील पलटणनायक रवींद्र प्रभाकर चरडे तसेच सार्जेन्ट अमित शंकरराव तिमांडे यांना यावर्षीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रवींद्र चरडे हे गत २३ वर्षांपासून गृहरक्षक दलात सेवा देत आहे. यापूर्वी नागपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात ते सेवारत होते. त्यांनी विविध प्रशिक्षण पूर्ण केले असून बंगलोरच्या प्रशिक्षणात त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले होते. देवळी तालुक्यातील दिघी येथील पूरात अनेकांचे प्राण त्यांनी वाचविले होते. खरांगणालगत अरवली स्फोटक कंपनीत उत्कृष्ट बचाव कार्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचा सन्मान केला होता. तसेच तेलंगना राज्यात निवडणूक बंदोबस्त, नाशिक कुंभमेळा, भरती प्रक्रिया व अन्य कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गृहरक्षक महासमादेशक यांच्याकडून दोन वेळा रोख पुरस्कार प्राप्त झाले आहे.
अमित तिमांडे यांची १८ वर्ष सेवा झाली असून जिल्हा प्रशासनाने त्यांचा पूर्वीच सन्मान केला आहे. विविध पूर, सेलू येथील आग, वर्धेतील मध्यवस्तीत लागलेली आग तसेच विविध उपक्रमात त्यांचे भरीव योगदान राहलेले आहे. तत्कालीन जिल्हा समादेशक प्रवीण हिवरे यांनी सुरूवातीच्या काळात केलेले मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले, अशी भावना दोघेही व्यक्त करतात. त्यांना प्राप्त पुरस्काराबद्दल जिल्हा समादेशक असलेले अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.सागर कवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.