वर्धा : रोहीत पवार हा महाराष्ट्राच्या आगामी २५ वर्षांच्या काळातील प्रमुख स्वच्छ राजकीय चेहरा राहील, अशी खात्री पिता राजेंद्र पवार यांनी आपल्या पुत्राविषयी दिली आहे. राज्याच्या राजकारणातील प्रसिद्ध पवार कुटुंबातील धाकटी पाती म्हणून आमदार रोहीत पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी संघर्ष यात्रा काढत जनसंवादाचा पवित्रा राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतला. यात्रेचे विदर्भात ठिकठिकाणी स्वागत झाले. मात्र या यात्रेला सुरूवातीलाच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागी होत त्यांचे वडिल उद्योजक राजेंद्र पवार यांचाही आशिर्वाद लाभत आहे. ते दहा दिवस यात्रेत सहभागी झाले. रोज सरासरी २० ते २५ किलोमीटर चालत असल्याचे ते सांगतात. सहभाग कशासाठी, यावर राजेंद्र पवार यांनी लोकसत्ताशी संवाद साधला. ते म्हणतात की नवी पिढी स्वत:च निर्णय घेते. आपण सोबत असतो. हे सोबत असणे सुध्दा प्रेरक असते. यामागे राजकीय संबंध जोडू नये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळात आमचे कुटुंब राजकीय नव्हतेच. पवारांच्या काटेवाडीतून माझे वडिल आप्पासाहेब पवार १९५५ ला बाहेर पडले. जो शिकला त्याने घराबाहेर पडावे, अश्या आजीच्या सुचनेने स्थलांतर झाले. आप्पासाहेबांनी कृषीक्षेत्रात केलेले काम उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यानंतर १९९० पर्यंत कृषीक्षेत्रात काम केल्यानंतर मी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी स्थापन केली. त्यावेळी रोहीतचे शिक्षण ग्रामीण भागातच झाले. व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीसाठी तो प्रथमच मुंबईत गेला. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्मास आला म्हणून त्यास वेगळी वागणूक मिळाली नाही. परदेशी पाठविले नाही. घरच्या कंपनीची जबाबदारी सोपविली. तो बॉस आहे, हे समजल्यावर कंपनीचे अधिकारी त्यास किंमत द्यायला लागले. तो पर्यंत आमचा शरद पवारांसाठी थेट संपर्क नव्हता. रोहीतने चैन म्हणजे काय हे कधी पाहले नाही. गुरंढोरं राखणाऱ्या कुटुंबात त्याचा वावर राहला.

हेही वाचा : इथेनॉल बंदीमुळे साखरउद्योग संकटात; कारखान्यांना राज्य बँकेचा कर्जपुरवठा बंद,आधारभूत किमतीत वाढीची मागणी

मुळत: तो लाजाळू वृत्तीचा. कोणाशीच बोलायचा नाही. मात्र कोणत्याही कामात पूर्णपणे झोकून देण्याचा त्याचा स्वभाव. काहीच ठरले नसतांना तो जिल्हा परिषद निवडणूकीत उभा राहला व मोठ्या मताने निवडून आला. त्याला चूकीच्या गोष्टी आवडत नाही. भ्रष्टाचाराला थारा देत नाही. त्याचा शरद पवारांशी राजकीय संबंध विधानसभेच्या निवडणूकीवेळीच आला. कौटुंबिक होताच. त्याची व्यवहार कुशलता पाहून ते त्याला आमच्यातला ‘मारवाडी’ म्हणून गंमतीत म्हणायचे. त्याने स्वच्छ राजकारण करावे. अन्यथा सोडून द्यावे. चुकीचा पैसा घरात आणू नको, असे स्पष्ट सांगणे आहे. राजकीय डावपेच चालतातच. पण घाण घरात यायला नको. यास त्याच्या प्रसिद्ध कुटुंबातून आलेल्या पत्नीची पण १०० टक्के साथ आहे.

हेही वाचा : सहकार कायद्यातील सुधारणा मागे; राष्ट्रवादीच्या विरोधामुळे सरकारचा निर्णय 

विदर्भात त्याच्या यात्रेला विशेष प्रतिसाद लाभला. लोकं बोलतात. एका कापूस वेचणाऱ्या महिलेने तीन मुलींचे लग्न स्वबळावर केली. हे ऐकूण कष्टाचे मोल समजते. आमच्या कुटुंबात कोणी कोणाला सल्ला देत नाही. त्यामुळे रोहीतची यात्रा हा त्याचा पूर्णपणे स्वत:चा निर्णय आहे, असे राजेंद्र पवार निक्षून सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha rajendra pawar said rohit pawar will be important face in maharashtra politics for next 25 years pmd 64 css