वर्धा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रथमच वर्ध्यात मुक्कामी येत आहेत. आज शुक्रवार ते उद्या शनिवारी सकाळी ते गाठीभेटी घेणार आहे. त्यांचा दौरा नेहमी शिस्तीत व गोपनीय स्वरूपात व प्रसिद्धी माध्यमापासून दूर ठेवल्या जाण्याचा शिरस्ता आहे. प्राप्त माहितीनुसार मोहन भागवत हे नागपुरातून थेट वर्ध्यात हिरामण पारिसे या ज्येष्ठ स्वयंसेवकाकडे जातील. तिथे उपवासाचा फराळ करणार. येथे कुणाशीही भेटणार नाही. त्यानंतर ते नालवाडी परिसरातील अक्षय शिंगरूप यांच्याकडे जाणार आहेत. येथे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ स्वयंसेवकांशी ते चर्चा करतील. निवडक जणांना निमंत्रण आहे. या ठिकाणी त्यांचा चार तास मुक्काम आहे. पुढे ५ वाजता भगतसिंग सायंशाखेस ते भेट देतील. बाल ते युवा गटातील सेवकांशी संवाद साधणार. नंतर गटशिक्षक व गटनायक यांच्याशी चर्चा करतील.
सध्या संघाच्या सायं शाखा बंद पडत आहे. त्यामुळे शिशु, बालक यांना संस्कारीत करण्याचे काम मंदावले असल्याची खंत सेवक व्यक्त करीत असतात. संघाशी नाते सांगत मग मोठे झाल्यावर केवळ कामापुरते येतात. बालपण मोबाईल विश्वात हरवीत चालले आहे. त्यामुळे या सायं शाखा बळकट करण्याची गरज जुने जाणते सेवक व्यक्त करीत असतात. त्या संदर्भात मोहन भागवत हे उदबोधन करणार असल्याचे समजले. हा कार्यक्रम आटोपल्यावर भागवत हे पुन्हा शिंगरूप यांच्याकडे मुक्कामासाठी जाणार असू कुणाशीही भेट होणार नसल्याचे समजते. शनिवारी १७ ऑगस्टला सकाळी देशमुख लॉन येथे ते प्रवासी स्वयंसेवकशी चर्चा करतील. प्रामुख्याने प्रभात शाखेत कार्यरत या ठिकाणी सहभागी होणार आहे. शिंगरूप यांनी यांस पुष्टी दिली.कुठलाच कार्यक्रम खुला नसून केवळ आमंत्रित असलेलेच भेट घेऊ शकतील.
हेही वाचा : वाहनचालक आहात? जर्मनीला जाऊ शकता? मग ही ३० लाखांची संधी….
पुढील वर्ष संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर काही नवे उपक्रम संघ सुरू करू शकतो. त्याची चाचपणी या दौऱ्यात होण्याची शक्यता काही संघप्रेमी व्यक्त करतात.सप्टेंबर १९२५ मध्ये संघाची स्थापना झाल्यानंतर नागपूर बाहेर पहिली शाखा वर्धा शहरात स्थापन झाल्याचा इतिहास आहे. ठाकरे मार्केटच्या मैदानावर ही पहिली शाखा सायं शाखेच्या रूपात सुरू झाली. याच शाखेत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त हे घडले. पुढे अनेक शाखा सूरू झाल्या. वाढती संख्या लक्षात घेऊन १९९५ मध्ये भगतसिंग सायं शाखा सुरू झाल्याचा इतिहास असल्याने भेटीस महत्व आहे.