वर्धा : दत्ता मेघे यांच्या वर्धा येथील वैद्यकीय साम्राज्याचा दर्शनी चेहरा म्हटल्या जाणारे डॉ. उदय मेघे यांनी अत्यंत गोपनीयता राखून काँग्रेस प्रवेश घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी पत्नी मनिषा मेघे यांच्या समवेत उपस्थित होत पक्ष प्रवेश केला. तसेच वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज पण दिला. त्यांच्या या कृतीने मेघे परिवार हादरून गेल्याचे चित्र पुढे आले आहे.
सर्वात तिखट प्रतिक्रिया मेघे संस्थांचे सूत्रधार सागर मेघे यांनी दिली आहे. एका निवेदनातून सागर मेघे यांनी स्पष्ट केले की यापुढे तुझा चेहराही दाखवू नकोस, असे व्हाट्स अँप वर संदेश टाकून त्यास कळविले आहे. उदय मेघे यांनी कोणतीही कल्पना न देता किंवा आमच्या परिवारास विश्वासात नं घेता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. गेल्या वीस वर्षापासून संस्थेच्या कामामुळे जवळचे संबंध निर्माण झाले होते. म्हणून त्यांना महत्वाचे पद देत संस्थेच्या हिताची जबाबदारी सोपविली. मात्र नैतिकतेचे पालन न करता अचानक पाठीत खंजीर खुपसेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांचे हे कृत्य विश्वासघात करणारे असून आपला चेहराही दाखवू नकोस असा निरोप दिला असल्याचे सागर मेघे यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : अमरावती : कारागृह प्रशासन अवाक्! कैद्याने तयार केला स्वत:चा बनावट शिक्षामाफी आदेश…
आमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार असल्यास मेघे समूहाशी तसेच माझ्या परिवाराशी कोणतेही संबंध यापुढे राहणार नाही, असाही निरोप स्पष्टपणे देण्यात आला आहे. यापुढे मी त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. ज्या पक्षात उदय मेघे यांनी प्रवेश घेतला आहे, तो पक्ष उदय मेघेस विधानसभेची उमेदवारी देईल, असे मला वाटत नाही. आणि उमेदवारी दिलीच तर भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार डॉ. पंकज भोयर हेच निवडून यावेत यासाठी मी अथक प्रयत्न करणार, असा इशाराही सागर मेघे यांनी आज दिला.
हेही वाचा : धक्कादायक.. नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीच्या जोरावर विदेशात नोकरी!
हा संताप व्यक्त करण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. एक तर येथील मेघे अभिमत विद्यापीठाचा सर्व कारभार उदय मेघे हे एकहाती सांभाळत होते. मेघे परिवाराचा अधिकृत स्थानिक चेहरा म्हणून लोकं विविध मदतीसाठी त्यांच्याचकडे धाव घेत. रुग्णसेवा किंवा वैद्यकीय कारभारातील अडचणी सोडविण्यात त्यांचेच प्रथम मार्गदर्शन अधिकारी वर्ग घेत असे. आता कोण असा प्रश्न आहे.