वर्धा : म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पण इथे तर पाय पाळण्याबाहेर आल्याचा किस्सा घडला. नक्की हा मोठा होणार असा विश्वास व्यक्त होतोय. येथील युवा समाजसेवी सारंग रघाटाटे यांचा मुलगा साहस याने विक्रमास गवसनी घातली. इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था देश पातळीवर स्पर्धा घेत असते. त्यांच्या सामान्य ज्ञान स्पर्धेत महाकाव्य या विषयात साहसने फक्त अडीच मिनिटांत ५० प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. रामायण या विषयात ही स्पर्धा झाली. तामिळनाडू येथील सहा वर्षीय बालिकेस त्याने मागे टाकले. तिने साडे आठ मिनिटांत ७५ उत्तरे दिली. पण वय व वेळ या निकषावर साहस अव्वल ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ ते ६ या वयोगटात ही स्पर्धा झाली. रामायण हे प्रदीर्घ महाकाव्य. त्यातील घटनांची वेगवेगळी वळणे. मात्र तरीही वेळेवर आलेल्या प्रश्नांना साहस सामोरे गेला. तो भवन्स मध्ये शिकत असून त्यास वाचनाची खूप आवड आहे. आई प्रियंका रघाटाटे यांनी साहस यांस लहानपणापासून पाठांतराची सवय लावली. त्याने अनेक धार्मिक ग्रंथ वाचून काढले असल्याचे त्या सांगतात. या विक्रमाची स्वातंत्र्यदिनी नोंद झाली. त्याचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या झेंडावंदन कार्यक्रमात होणार होता. पण ते होवू शकले नाही. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साहस यांस खास बोलावून त्याचे कौतुक केले. त्याला केलेल्या विक्रमाचे मेडल व प्रमाणपत्र बहाल केले. इतक्या लहान वयात इतके सखोल ज्ञान ही कौतुकाचीच नव्हे तर आश्चर्यांची बाब ठरते, असे मान्यवर म्हणाल्याचे वडील सारंग रघाताटे सांगतात.

हेही वाचा : वर्धा : सरसंघचालक प्रथमच मुक्कामी दौऱ्यावर, संघ वर्तुळात…

ही स्पर्धा संपूर्ण देशात ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाते. त्यात प्रश्नमाला दिल्या जाते. उत्तरे त्याचवेळी अपेक्षित असतात. दोन वर्षाचा असतांनाच साहसला लहान मोठ्या वस्तूंचे निरीक्षण करण्याची आवड निर्माण झाली होती. त्या बाबत उपलब्ध साहित्य तो बघायचा. हा गुण बघून त्याच्या आईने वाचन करण्यास त्याला प्रोत्साहन दिले. पुढे स्पर्धेची माहिती मिळाल्यावर त्याची तयारी करुन घेतली. आज साहस या चिमुकल्याची गुणवत्ता बड्या अधिकाऱ्यांनी अधोरेखित केल्याने आईवडील कृतकृत्य झाल्याचे दिसून आले. परिचित त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha sahas raghatate won ramayan quize competition at national level pmd 64 css