वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव आणि श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा आरंभ आज गणरायाच्या आगमनाने झाला.सावंगीच्या शैक्षणिक परिसरात आयोजित या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्ञानविज्ञान प्रदर्शनी, विविध आरोग्य शिबिरे आदींचे वैविध्यपूर्ण आयोजन नागरिकांकरिता करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी सायंकाळी पोलीस गौरव करणारा कार्यक्रम होणार आहे. त्यास पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबास खास निमंत्रित करण्यात आले आहे.
आरोग्यम धन संपदा.
सावंगी येथे आज सकाळी कुलपती दत्ता मेघे व शालिनीताई मेघे यांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची स्थापना झाली. सायंकाळी आरोग्यम् धनसंपदा या ज्ञानविज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. यावर्षीही या महोत्सवानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असलेले विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर, सायंकालीन सत्रात विविध प्रांतातील लोककला, संगीत रजनी, नाटिका, नृत्य व अन्य कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षण असलेली स्वरवैदर्भी विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा रविवार, दि. ८ ला सायंकाळी ७ वाजता होणार असून त्यातून यावर्षीचा वैदर्भीय युवा गायक अथवा गायिका निवडण्यात येणार आहे. उत्सवाच्या या सर्व दिवसात प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन कुलपती दत्ता मेघे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
हे ही वाचा… अकोला : गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’,मूर्तीच्या किंमतीत २० % वाढ
गो ग्रीन
यावर्षी गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत पर्यावरण पूरक उपक्रम होणार. परिसरातील ४० एकर परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण सूरू झाले आहे. इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा होत आहे. तसेच वाराणशी येथील ब्रम्हवृंदाची गंगारती होईल.या काळात नागरिकांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर, महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, शरद पवार दंत रुग्णालय यांच्याद्वारे विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा…बुलढाणा : नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीसाठी भर पावसात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर!
नागरिकांनी जनजागृतीपर कार्यक्रमांचा तसेच आरोग्यदायी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डाॅ. ललित वाघमारे, प्रशासकीय महासंचालक डाॅ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे. आरोग्य शिबिरात मोफत तपासणी होत असून सुपर स्पेशालिटी अंतर्गत ५० विशेष आरोग्य उपचार केल्या जाणार असल्याचे डॉ. वैशाली कुचेवार व डॉ. अंजली बोरले यांनी नमूद केले.