वर्धा : शालेय मुलांना मिळालेली नवी ओळख संताप निर्माण करणारी ठरत आहे. पोषण शक्ती आहारात पूरक पोषण देण्याचा निर्णय झाला. त्यात अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रवार लाल ठिपका तर शाकाहारी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रवार हिरवा ठिपका देण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे. यामुळे शाळांस्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी व केळी देण्यात सुलभता येईल. तशी व्यवस्था ओळखपत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीने करण्याची सूचना सरकारने केली आहे. नाविन्यपूर्ण योजनेत अंडी व केळी वाटप करतांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. ते लक्षात घेऊन लाल व हिरव्या रंगाचे ओळखपत्र देण्याचा पर्याय पुढे आल्याची ही घडामोड आहे. मात्र ही बाब शालेय शिक्षण वर्तुळात संताप निर्माण करणारी ठरत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण क्षेत्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असणारे राज्याचे माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे म्हणतात की हे चुकीचे आहे. लाल / हिरवे ठिपके देणे आणि तेही ओळख पत्रावर ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. ही खुळी कल्पना कोणाच्या डोक्यातून आली ते कळत नाही. ओळखपत्र हे गळ्यात अडकवून ठळकपणे दिसले पाहिजे असे असते. लहान मुलांचं भाव विश्व या लोकांना अजिबात कळत नाही असे दिसते. लहान सहान बाबींवरून मुले एकमेकांना चिडवत असतात. असे जर ओळखपत्रावर ठिपके दिसले तर ते एकमेकांना नक्कीच चिडवतील. जसे “अंडी खाया”, “भाजी खाया” वगैरे. मुलींची तर गोची होणार शरमेने. खेड्यांतील वातावरण वेगळंच असते. ते अंड्यांना मांसाहारातच मोजतात.
हेही वाचा : ओबीसी नेत्यांनाही महत्त्व
विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप म्हणाले की आता त्या बाबत विद्यार्थ्यांच्या मध्ये होणाऱ्या चिडवीणे प्रकार वाढण्याच्या शक्यता लक्षात घेता तसेच त्यांत मांसाहारी / शाकाहारी भेदाभेद होणार . हे रंग खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर असतात . मुलांच्या ओळखपत्रावर चुकीचेच. याला विदर्भ मुख्याध्यापक संघ विरोध करून पत्र देणार आहे.