वर्धा : राजकीय नेत्याची अंत्ययात्रा अलोट गर्दीसह निघण्याची बाब नवी नाही. मात्र, एका छोट्या गावात दोन किलोमीटर लांबीच्या गर्दीची अंत्ययात्रा एका शिक्षकासाठी निघण्याची बाब आश्चर्याचीच म्हणावी लागेल. देवळी येथील पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत पंकज विष्णूपंत चोरे यांचे क्रिकेटच्या मैदानावर खेळताखेळता हृदयविकाराने निधन झाले. हा मृत्यू पंचक्रोशीत धक्कादायी ठरला. असे झालेच कसे, असा प्रश्न ज्याच्या-त्याच्या मुखी उमटला. आज या भावनेचे प्रत्यंतर आले. देवळीत संपूर्ण शुकशुकाट पसरला. पानटपऱ्यांसह सर्व बंद. देवळीत येणारे सर्व रस्ते गर्दीने ओसंडले. गाव ते स्मशानभूमी अशा दोन किलोमीटरच्या अंतरात गर्दी व ती पण हमसूहमसू रडणारी. शेवटी स्मशानभूमीत दु:खाचा कडेलोट झाला. देवळीतील चारशेवर महिलांची यावेळची रडवेली उपस्थिती वातावरणास कातर करून गेली.
खासदार रामदास तडस कसेबसे सांत्वनापर दोन शब्द बोलले. भाजप नेते राजेश बकाने, प्रवीण कातरे, गिरीश काशीकर, सर्व नगरसेवक, गावपुढारी, डॉक्टर, शिक्षक असे सर्व स्तरातील गावकरी उपस्थित होते. गिरीश काशीकर सांगतात की, अशी अंत्ययात्रा गावाने कधीच पाहिली नाही. पंकज चोरे हे स्वत: शिक्षक व सोबतच सृजन नावाची गोरगरिबांसाठी शाळा चालवायचे. पट्टीचा शिक्षक म्हणून ते विद्यार्थीप्रिय. गरजूंना सदैव मदतीचा हात देणारा हा शिक्षक मागासवर्गात अत्यंत आवडता होता. गरजू मुलांचे परीक्षा शुल्क स्वत: भरण्यास तत्पर. नेहमी आनंदी व हसमुख, असा हा शिक्षक मृत्यूमुळे गावाला चटका लावून गेला.