वर्धा : महाराष्ट्रात शाळा सुरू होण्याची वेळ कोणती असावी, हा मुद्दा उन्हाळा आला की ऐरणीवर येत असतो. त्यातच मग नवे सत्र केव्हा सुरू करायचे हा पण वाद उद्भवत असल्याचे नेहमीचे चित्र राहते. इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात रणरणते उन्ह असल्याने विदर्भात शाळेची वेळ वेगळी ठरविली जाते.

आता कडक उन्ह तापायला सुरवात झाली आहे. त्याची झळ शालेय विद्यार्थ्यांना पोहचत आहे. या बाबीची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचनालयाने नवे पत्रक काढले आहे. महसूल विभागाच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाचा संदर्भ त्यास आहे. आता राज्यातील सर्वच शाळांची वेळ सकाळची करण्यात आली आहे. वाढलेल्या उन्हाच्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यवार विपरीत परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी विविध संघटनानी शाळेची वेळ बदलण्याची मागणी करणारे निवेदन शासनास दिले आहे. शिवाय काही शाळांनी स्वतःच वेळ बदलून सुधारित शाळा प्रारंभ वेळ सुरू केली. त्यामुळे शाळा सुरू होण्याची वेळ वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी असल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळेची वेळ सकाळी सात ते सव्वा अकरा वाजेपर्यंत राहणार. माध्यमिक शाळा सकाळी सात ते पावणेबारा या वेळेत भरतील. स्थानिक परिस्थितीनुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने वेळेत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ टाळावेत. मैदानात वर्ग घेऊ नयेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करावे.वर्ग खोल्यातील पंखे चालू असतील याची खात्री करून घ्यायची आहे. शाळेत विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध असले पाहिजे. पाण्याचे उच्च प्रमाण असणारी टरबूज, खरबूज, संत्री, अननस, काकडी तसेच स्थानिक पातळीवार उपलब्ध फळे व भाज्या खायला मिळाव्या. मुलांनी पातळ, सैल, सुती व शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल व अन्य पारंपरिक साधनाचा वापर करणे अपेक्षित आहे. बाहेर उन्हात जातांना शूज किंवा चप्पल वापरावी. उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे. शाळा व्यवस्थापन समितीस या सूचना अंमलात आणायच्या आहेत.