वर्धा : विशिष्ट परिस्थितीत कुणाकडूनही गुन्हा घडू शकतो. त्याचा पश्चाताप मग होतो. पण कोठडीत गेल्यावर स्वातंत्र्य हरविते, संवाद सुटतो, आप्त दुरावतात. हे एकाकीपण भासू नये म्हणून वर्धा मध्यवर्ती कारागृहने एक सुविधा बंदिवान कैद्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याचे स्वागत होत आहे. बंदिवान व्यक्तीस उपलब्ध होणारी ही सुविधा त्यास नक्कीच दिलासा देणार, असा विश्वास व्यक्त होतो.

काय आहे ही सुविधा ? तर त्याचे नाव अँलन स्मार्ट कार्ड फोन सुविधा. यामुळे प्रत्येक बंद्यास त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांशी तसेच वकिलाशी बोलता येईल. आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे त्यास संवाद साधता येईल. त्यासाठी कारगृहात चार स्मार्ट कार्ड फोन लावण्यात आले आहे. सध्या दुरवर राहणाऱ्या नातेवाईकांना बंदी व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी कारागृहात नाव नोंदवावे लागे. नंतर प्रत्यक्ष मुलाखत घडून येण्यासाठी तिष्ठत बसावे लागत होते. आता या सुविधेमुळे वेळ वाचनार. मात्र हा संवाद गोपनीय असणार नाही. या फोन संवादचे रेकॉर्डिंग होणार. त्याची वेळोवेळी तपासनी होणार.बंदी फोनवरून केवळ कौटुंबिक तसेच केसबाबतच चर्चा करू शकतील. या सुविधेचा गैरवापर केल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

या सुविधेचे उदघाटन मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही. एन. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह अधीक्षक नितीन क्षीरसागर, तुरुंगाधिकारी सुहास नागमोते, जितेंद्र भावसार, सुभेदार संजय वंजारी, हवालदार सी. व्ही. चामलाटे, गिरीश निमकर, अतुल जाधव, अमित कोठारकार, संदीप देशमुख, शंकर वाघमारे, भाविनी निमसडे, मयूर चिंदरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. जे रक्ताचे नातलग आहेत त्यांचे आधारकार्ड व अन्य तपशील असणे आवश्यक आहे. बंद्याच्या नातेवाईकांना कारागृहाच्या मेल आय डीवर सत्य प्रतीत हे दस्तावेज पाठविणे आवश्यक आहेत. तसेच त्याची मूळ प्रत कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमा करणे अपेक्षित आहे, असे कारागृह अधीक्षक सूचित करतात. या माध्यमातून कारागृहातील सर्वच बंद्याना संवाद साधता येणार आहे. या फोन सुवेधेचा लाभ घेण्याबाबत कारागृह अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले. तसेच सुविधेचा उपयोग आवश्यक त्या अटी व नियम पाळून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्धा कारागृहने ही स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करून देत बंदी वर्गास दिलासा दिल्याचे म्हटल्या जाते.

Story img Loader