वर्धा : शासनाचा आदेश निमूटपणे पाळणाऱ्या गुरुजींनी एका आदेशास मात्र ठेंगा दाखविला आहे. शाळेच्या वर्गखोलीत शिक्षकांचे फोटो लावण्याचा आदेश शासनाने काढला होता. मात्र हा आदेश उपद्रवी व अवमानकारक असल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली होती. फोटो लावण्यात कमालीचा निरुत्साह दाखविला. ‘से नो फोटो’ हे आंदोलन झाले. आता शासनाने किती शाळेत फोटो लागले याचा अहवाल मागितला आहे. त्याची वस्तुनिष्ठ माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र खरीच माहिती देताना फोटो लावणाऱ्या शिक्षकांची संख्या शून्यच दाखवा, असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे.
हेही वाचा : बुलढाणा: चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, वाघजाळ गावात तिघांना मारहाण; लाखाचा ऐवज लुटला
आम्ही कुणीच फोटो लावला नाही, म्हणून शासन किंवा प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही. म्हणून विचारलेली माहिती देतांना संख्या शून्य दाखविणार, असा निर्धार शिक्षक नेते विजय कोंबे यांनी स्पष्ट केला. शून्य संख्या दिसून आल्यास सदर उपद्रवी उपक्रम शिक्षकांनी धुडकावून लावला, हे याबाबत उत्सुक असणाऱ्या लोकप्रतिनिधी यांनाही समजेल, असा टोलाही लावण्यात आला आहे.