वर्धा : रोटरी क्लब हा उच्चभ्रू मंडळींचा गोतावळा तसेच सेवाभावी कार्याची संघटना म्हणून ओळखल्या जाते. सामाजिक शिष्टाचार पाळण्याची यांचीही हमी असते, तसेच सामान्य नागरिकांना पण तीच अपेक्षा असते. ते गैर नाही कारण एकजात सर्व उच्च शिक्षित तसेच धन संपन्न असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पण आदर्शवादी असतो. मात्र त्यास गालबोट लागते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
कारण असे की, या सेवाभावी संघटनेने डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात व्यापार मेळा घेतला होता. येथील स्वावलंबी शाळेच्या वीस एकर परिसरात हा धनदांडगे प्रदर्शन करणारा मेळा रंगला. विविध झुले, नाना खाद्याचे स्टॉल, कार विक्रीचे प्रदर्शन व अन्य स्वरुपात मेळा असल्याने वर्धेकरांनी तुफान प्रतिसाद दिला. मात्र त्याचे कवित्व शिल्लक आहे. कारण या मैदानात आत्ता सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
हेही वाचा – नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रकचालकांचा चक्काजाम; यवतमाळ शहरातील वाहतूक खोळंबली
तंबू बांधण्यासाठी वापरलेले खिळे, कापडी पट्ट्या, बांबू काड्या सर्वत्र पसरले आहे. त्याचा त्रास गत पंधरा दिवसांपासून आबालवृद्ध, महिला, खेळाडू यांना होत आहे. हे मैदान शहराच्या मध्यभागी असल्याने शेकडो लोक या ठिकाणी पायी फिरण्यास सकाळी येतात. तसेच पत्रकार संघ पुरस्कृत हौशी क्रिकेट संघटना, माय मॉर्निंग ग्रुप तसेच अन्य मंडळी विविध खेळ खेळण्यास येतात. त्या सर्वांची आता आफत झाली आहे. कारण कचरा व दुर्गंधी पसरली आहे.
स्टॉल धारक मेळ्याच्या पंधरा दिवस आधी येतात तसेच मेळा आटोपल्यावर पुन्हा पंधरा दिवस सामान सावरण्यास लावतात. त्यामुळे महिनाभर खेळखंडोबा होतो. पण रोटरीचे पदाधिकारी आता ढुंकूनही बघत नाही. काहींनी त्यांना सफाई करण्याची विनंती केली. पण सर्व शांत आहे. आता आमचे काम संपले, तुमचे तुम्ही बघा, असा आविर्भाव दिसून येतो. खरे तर ही जबाबदारी त्यांचीच समजल्या जाते. पण प्रशासनातील वरिष्ठ तसेच बडे पुढारी हजेरी लावून गेले असल्याने कोण आमचे काय करणार, असा तर पवित्रा नाही ना, अशी चर्चा होते.
हेही वाचा – गडचिरोली : भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; तीन तरुणांचा मृत्यू
माजी नगरसेवक तसेच या मैदानावर नेमाने येणारे मुन्नाभाऊ झाडे म्हणाले की, ज्यांनी कचरा केला त्यांनीच तो साफ केला पाहिजे. हा साधा संकेत शिष्टाचारचे महामेरू म्हटल्या जाणाऱ्या सद्गृहस्थ मंडळींनी पाळावा. शेवटी नाहक त्रास होत असल्याने आज खेळाडूंनी सफाईचे काम हाती घेतले. मात्र मोठा परिसर असल्याने प्रशासन किंवा रोटरी पदाधिकारी लक्ष घालतील काय, अशी विचारणा होत आहे. एक आठवण अशी की साहित्य संमेलन आटोपले तेव्हा पदाधिकारी तसेच साहित्य रसिकांनी मैदान साफ करण्यात पुढाकार घेतला होता.