वर्धा : रस्त्यावरील वाढते अपघात चिंतेची बाब ठरत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियम कठोर केलेत. पण अपघात थांबता थांबेना. अपघात होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर मोकाट जनावरांची वाढती वर्दळ हे पण असल्याचे सांगितले जाते. रात्री मोकाट पशुचे रस्त्यावर फिरणे वाहनचालकांना गोंधळात टाकते. आणि अपघात घडतात, असे परिवहन खाते आकडेवारी देत स्पष्ट करते.
आता हेच खाते उपाय घेऊन पुढे आले आहे. अश्या पशुमुळे वाहनचालकांचे होणारे अपघात लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक अॅप विकसित केले आहे. त्या आधारे मोकाट पशुना जिओ टॅगिंग केले जाते. महामार्ग परिसरातील गावात असलेल्या पशुना असे रिफ्लेक्टिव बेल्ट लावले जातात. हे गळ्यातील पट्टे दुरवरून चमकतात. त्यामुळे वाहचालक सतर्क होत असल्याने अपघात टळतात. कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटना निश्चित कमी होतील, असा दावा आरटीओ विभागाने केला आहे. जनावरांचे रस्त्यावर येणे पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी हे पट्टे लागल्यास अपघात कमी होतील.
हेही वाचा…नागपूर ‘क्राईम कॅपिटल’ नव्हे तर ‘स्मार्ट सिटी’, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा दावा
मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी साठी आलेल्या नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या पुढे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी युसूफ समीर यांनी बेल्टचे सादरीकरण केले. हे पाहून समाधानी झालेल्या बिदरी यांनी अन्य जिल्ह्यात सुद्धा हा उपाय राबविला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. रात्रीच्या वेळी टक्कर होण्याच्या घटना कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत ५ हजार ५०० असे रिफ्लेक्टिव बेल्ट लावणार असल्याचे यावेळी नमूद केले. पोलीस अधीक्षक नुरूल हसन तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनीही हा उपक्रम यावेळी समजून घेतला. या कार्यात स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतल्या जाणार असल्याचे सुतोवाच कर्डीले यांनी केले.
हेही वाचा…नागपूर : तरुणीला नोकरीचे आमिष; जंगलात नेऊन बलात्कार
जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी प्रायोगिक तत्वावार लावण्यात आलेल्या टॅग चे फोटो घेतले जात आहे. मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच अन्य जनावरे दिसल्यास सूचित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.