वर्धा : मामा म्हणजे जिव्हाळ्याचं स्थान. हक्काचे नाते. पण याच नात्यात संतापी व दारुबाज भाच्याने काळिमा फासल्याची ही घटना आहे. पुलगाव येथील टिळक नगरात ती घडली. येथील एका घरी पती पत्नीत भांडण लागले होते. ते सोडविण्यासाठी मामा पोहचला. मामाचा हस्तक्षेप सहन नं झालेल्या भाच्याने मामाला ठोसा लगावला. त्यात मामा गतप्राण झाला. वसंत तुकाराम बांगरे हे ७१ वर्षीय गृहस्थ परिवारासह राहतात. रात्री आठच्या सुमारास त्यांचा भाचा आकाश तेटे हा दारू पिऊन घरी आला. पिऊन येताच त्याने पत्नीशी वाद घालणे सूरू केले.

तेव्हा त्याचे मामा वसंत बांगरे हे मध्यस्थी करण्यास गेले. वाद करू नकोस, शांत रहा असे समजावले. पण ऐकत नसल्याने त्यांनी भाच्याचा गालावर एक चापट पण मारली. त्यामुळे भाचा संतापला. त्याने मामाच्या मानेवर बुक्कीचा प्रहार केला. त्यामुळे मामा हे सोफ्यावर पडून बेशुद्ध झाले. त्यांना त्यांची पत्नी विजया बांगरे यांनी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र तपासणी केल्यावर मामा बांगरे हे मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पत्नी विजया यांनी पोलिसात तक्रार दिली.

हेही वाचा…नागपूरसह संपूर्ण विदर्भात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात

तर दुसऱ्या एका घटनेत मामाच नराधम निघाला अन आरोपी झाला. हिंगणघाट तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत मामानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलीने आईसह वडनेर पोलिसात तक्रार दिली आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात आईवडील शेतात गेल्याचे पाहून मामाने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ती ओरडली पण घरचे व आजूबाजूचे सगळेच शेतावर गेल्याने तिचा आकांत कुणाच्या कानी गेला नाही. सायंकाळी आईवडील, भाऊ घरी आले. पण भीतीपोटी या मुलीने काहीच सांगितले नाही.पुढे मामाने कुणाला सांगू नकोस नाही तर मारून टाकीन अशी धमकी देत परत शारीरिक संबंध ठेवले.

हेही वाचा…रेल्वेने उडवले आधी तीन वाघ, आता बिबट..

मात्र तब्बल सहा महिन्यांनी बिंग फुटलेच.पुढे पोटात दुखत असल्याचे मुलीने सांगितल्यावर तिला आईने दवाखान्यात नेले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे सोनोग्राफी तपासणीत निष्पन्न झाले. मुलीचे वय कमी असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत अवगत केले. त्यावर विविध गुन्हे मामावर दाखल करण्यात आले आहे. तसेच बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत पण गुन्हा दाखल झाला. आता हे प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. हे प्रकरण चांगलेच खळबळजनक ठरले आहे.