वर्धा : महाराष्ट्राचा द्वेष करणारे हे भाजप सरकार घालवून द्या, असे आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी, देशात एक नेता एक पक्ष, असे सरकार नकोच, अशी भूमिका मांडली.
महाराष्ट्र, विदर्भातील उद्योग गुजरातमध्ये गेले. आता यांनाही गुजरातमध्ये पाठवून देण्याची वेळ आली आहे. या लोकांनी संपूर्ण जगात हिंदुत्व बदनाम केले. केवळ विरोध करतात म्हणून तुरुंगात टाकले जाते. हे घराणेशाहीवार बोलतात, पण ज्यांचे घराणे आहे, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे, असा टोला ठाकरेंनी लगावला. मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे असेल तर ते मी नाही लोकं ठरवतील, जय शहांसारखे बसवून देणार नाही. मोदी व भाजप यांची अवस्था आता, ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा,’ अशी झाली आहे. देशात संमिश्र सरकारे चांगली कामे करतात. म्हणून एका पक्षाचे सरकार यापुढे नकोच, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा : शरद पवार नागपूरच्या मतदानाबाबत अमरावतीच्या सभेत काय म्हणाले ?
‘विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा’
यावेळी शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते. पण तसे कदापि होऊ देणार नाही. वाटेल तो त्रास सहन करू पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही. यासाठी आघाडीला मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनीही केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. उमेदवार अमर काळे, माजी मंत्री अनिल देशमुख, रणजीत कांबळे, रोहिणी खडसे यांचीही भाषणे झालीत.