वर्धा : शेतात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला चढवून २ गोऱ्हे ठार केले. तर वाघाने पंजा मारल्याने २ गाई जखमी झाल्यात. मात्र, हा बिबट असल्याचे वनाधिकारी सांगतात. ही घटना सेलू तालुक्यातील जामनी शेतशिवारात आज मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यात शेतकरी नानाजी ढोडरे रा. जामनी यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार नानाजी ढोडरे यांची मौजा जामनी शिवारात शेती असून त्यांच्याकडे जनावरेही आहेत. ते आपली सर्व जनावरे शेतातच बांधून रात्रीला जागलीलाही राहतात. सोमवारी ते सायंकाळी जनावरांना बांधून चारापाणी करून घरी आले होते. मात्र, काल ते काही कारणामुळे शेतात गेले नव्हते. आज, मंगळवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना वाघाने २ गोरे मारल्याचे व २ गाईना जखमी केल्याचे दिसून आले. ही घटना मध्यरात्री १ ते दीड वाजताच्या सुमारास घडली असावी असा अंदाज लावल्या जात आहे. याची माहिती वन विभागाच्या झडशी येथील अधिकाऱ्यांना देण्यात आली. क्षेत्र सहायक घनश्याम टाक यांनी आपले सहकारी वनरक्षक मनोहर ढाले यांना सोबत घेऊन घटनास्थळी जात पंचनामा केला. शेतकऱ्याचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा…मोसमी पाऊस अकोला, पुसद येथे पोहोचला! उर्वरित विदर्भात मात्र…
गावकरी हा वाघाचा हल्ला असल्याचे म्हणतात. पण उप वनाधिकारी पवार यांनी हा बिबट्याचा हल्ला असल्याचे नमूद केले. तसेच गत आठवड्यात बिबट व शेतकऱ्यात झटापट झाली होती. पण हा हल्ला त्या बिबट मादीचा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच परिसरात एका मादी बिबटने एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता. तेव्हा कशीबशी दगडफेक करीत शेतकऱ्याने बिबट हल्ला परतवून लावलं होता. मात्र या मादीचे पिल्लू गावकऱ्यांनी ते जखमी असल्याने ताब्यात घेतले होते. रात्री वन विभागाने ते ताब्यात घेतले व उपचार करीत पहाटे जंगलात सोडले. मादा बिबटने ते अलवार आपल्या तोंडात पकडून धूम ठोकली होती. त्याच बिबट्याने हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अधिकाऱ्यांनी ती शक्यता नाकरण्यात आली आहे.
हेही वाचा…देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काय आहे विदर्भ कनेक्शन ?
वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले पाहून कॅमेरे लावण्यात आले आहे. गत एक महिन्यात असे हल्ले वारंवार होत असल्याचे दिसून येते. हे प्रकार वन खात्यास घायकुतीस आणणारे ठरत आहे. दुसरीकडे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने ते हिंस्त्र प्राण्यास मारण्याची परवानगी मागत आहेत. गत आठवड्यात झालेल्या बिबट व शेतकरी यांच्यातील झटपटीने ग्रामस्थ्यांनी संताप व्यक्त करीत भावना मांडल्या होत्या.