वर्धा : देशावरील संकट संपले नसून यापुढे कठीण लढाई लढायची आहे, असे प्रतिपादन भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी केले. भारत जोडो अभियानची दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक आज सेवाग्राम येथे सुरू झाली. देशभरातून अडीशेवर प्रमुख कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत. बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी योगेंद्र यादव यांनी अभियानाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत देशाची लोकशाही व्यवस्था वाचविण्यात भारत जोडो अभियान यशस्वी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव झाला आहे. इंडिया आघाडीला बहूमत मिळाले नसले तरी आत्मविश्वास मात्र वाढला आहे. या अभियानाचा उद्देश लोकशाही संविधान वाचविणे हाच आहे. भाजप आणि संघाचा पराभव करणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट नसून सामाजिक सुधारणेचे कार्य करण्याचे आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही. निवडणुकीत सहभाग आणि लाेकांच्या मनातून द्वेषबुध्दी दूर करणे असे दुहेरी काम आम्हाला करायचे आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : अकोला जिल्ह्यात कोसळधारा! घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू; ८३ घरांची पडझड, दोन तालुक्यात अतिवृष्टी
पहिल्याच सत्रात विजय महाजन यांनी अखिल भारतीय विस्ताराबाबत भाष्य केले. प्रा.आनंदकुमार यांनी नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या कामगिरीवर भाष्य केले. गुजरातमध्ये वातावरण बदलत असल्याचे मत श्रीमती स्वाती यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ अभ्यासक कुमार प्रशांत यांनी दीर्घकालीन कार्याची गरज व्यक्त केली. लोकशाहीत लोकांच्या राजकारणाची कमी चर्चा होते. त्यामुळे लोककेंद्री राजकारणाला मजबूत करण्याची गरज कुमार यांनी व्यक्त केली. तुषार गांधी म्हणाले, नागरी संघटनांनी तटस्थ राजकीय भूमिका न घेता पुढील पाच वर्षातील राजकीय हस्तक्षेपाचे नियोजन करावे. निवडणुकीत बहुमत कमी झाले असले तरी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत काहीही बदल झाला नाही. म्हणून सामाजिक व राजकीय काम एकत्रित करण्याची गरज आहे. ललित बाबर यांनी अध्यक्षीय भाषणातून भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्रातील कार्याचा आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात योगेंद्र यादव यांनी राजकीय ठराव मांडला. उल्का महाजन यांनी ठरावाचे अनुमोदन करताना संविधानातील मूल्यांचे रक्षण करण्याचे काम प्रामुख्याने मुस्लीम, दलित व आदिवासी बांधवांनी केल्याचे नमूद केले. अभियानाने महाराष्ट्रात ३० व देशभरात १३६ मतदारसंघात योगदान दिले. त्यापैकी महाराष्ट्रात २० व देशात ७४ ठिकाणी इंडिया आघाडीने यश मिळविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत अविक शहा, विजय तांबे, राजू भिसे, फिरोज मिठीबोरवाला, पंकज पुष्कर, आनंद माजगावकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी मत मांडले.