वाशीम : शिक्षक सोनुने यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याच्या घटनेला ३ दिवस होत नाही तर पुन्हा एकदा जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम एरंडामध्ये भर वस्तीत हनुमान मंदिराच्या पारावर बुधवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोराने गाडीवर येऊन रॉडने प्राणघातक हल्ला केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था किती ढेपाळली याचा अंदाज येतो आहे.

मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील ४५ वर्षीय गजनन उत्तम सपाटे यांची बुधवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना ११२ वरून मिळालेल्या माहिती वरून पोलीस स्टेशनचे कर्मचारी किशोर वानखेडे हे घटना स्थळी पोहोचले होते. घटनेचे गांभीर्य पाहून उप विभागीय पोलीस अधिकारी नीलिमा आरज, ठाणेदार प्रदीप राठोड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. सदर घटना शेतीच्या वादातून घडल्याची माहिती आहे.

हेही वाचा : विजेची मागणी वाढली, कोळशाच्या साठ्यात घट!

तपासाची चक्रे गतिमान केली असून असून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यामुळे घटना स्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एकाच आठवड्यात सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर दोन्ही घटनेतील हल्लेखोर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पोलीस यंत्रणा सुस्त, गुन्हेगार निर्ढावले

वाशीम जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. वरली, मटका, जुगार, अवैध वाळू वाहतूक, अवैध गुटखा, सट्टा बाजार यासह अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. यातून अनेक ठिकाणी किरकोळ वादातून गंभीर घटना समोर येत असून जिल्ह्यात पोलिसांचा धाकच उरला नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे. मात्र यावर कडक अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पुढाकार घेतील का ? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

Story img Loader