वाशीम : सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेतकऱ्यांचा विमा हप्ता सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर केवळ एक रुपया भरून विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु काही सीएससी केंद्रांवर एका रुपयाच्या विम्याकरिता शंभर रुपये शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून समोर येत आहेत.
सीएससी केंद्रावर सध्या पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. केवळ एक रुपयात पीक विमा सरकारने जाहीर केला. परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहेत. राज्याच्या कृषी आयुक्तांनी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क केंद्रात देऊ नये वा केंद्र चालकांनी शेतकऱ्याकडून अधिकचे शुल्क न घेण्याचे स्पष्ट सुचित केले आहे. मात्र, केंद्र चालकांनी कृषी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा – प्राथमिक शिक्षकांचे १५ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन
शेतकरी वर्गात जनजागृती केली जात आहे. कुणीही अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या केंद्राची तक्रार करावी. दोषीवर नक्कीच कारवाई करू. -आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तरुणाने लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी!
एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत काही सीएससी केंद्रावर अतिरिक्त शुल्क घेतले जात आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील कुठल्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या प्रकारावर तात्काळ प्रतिबंध करावा. तसेच दोषी केंद्राची मान्यता रद्द करावी. -पवन राऊत, जिल्हाध्यक्ष, रा.वी.कॉ.