वाशीम : शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे जिल्ह्यात आले होते. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे नगारा वाजवून आशीर्वाद घेतला. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकात नवं चैतन्य संचारले असून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांच्या विरोधात कुणाच्या नावावर शिक्का मोर्तब होणार हे मात्र, अजूनही कोडेच आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ सप्टेंबर रोजी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी, बाबणलाल महाराज समाधी स्थळी माथा टेकवून महंताचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिव सैनिक व जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, विधान परिषद चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर यांच्यासह मोठ्या संख्येने शिव सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदार भावना गवळी यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे.
हेही वाचा… उपराजधानीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावावर देहव्यापार; दलालांच्या टोळ्या सक्रिय, सांकेतिक भाषेचा वापर
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा नवीन चेहरा कोण यावरून चर्चेला उधाण आले असून माजी मंत्री संजय देशमुख, पोहरादेवी चे महंत सुनील महाराज की दुसराच उमेदवार राहणार यावरून तर्क वितर्क लावले जात असून शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याची चाचपणी शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे.
हेही वाचा… नागपुरात सुसाट स्कूलबस, व्हॅन, ऑटोंमुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात; वाहतूक पोलिसांची कारवाई नाममात्र
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी पक्ष बांधणी ताकतीने सुरू आहे. उमेदवार कोण राहील हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. – डॉ. सुधीर कव्हर. जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट