वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.६१ टक्के मतदान झाले. वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनीही मतदानाचा हक्क बाजावीत सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३७ मतदार आहेत. जिल्ह्यात १ हजार ७६ केंद्र आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठया प्रमाणावर जन जागृती केली. मतदान केंद्रावर सोई सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
आज सकाळी ७ वाजता पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. सध्या मतदानाची गती संथ असून सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ७. ६१ टक्के नोंद झाली. सर्वात कमी टक्केवारी ही कारंजा तालुक्यातील आहे. दुपार नंतर मतदानात वाढ होईल असा अंदाज आहे. वाशीम च्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सिव्हिल लाईन येथील विद्या निकेतन शाळेत मतदानाचा हक्क बाजावीत सर्वांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.