वाशीम : यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही दुष्काळी सवलती कधी लागू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात एकूण ४६ महसूल मंडळ असून त्यापैकी ३८ मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. परिणामी या भागातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना विशेष सवलती लागू होतात. मात्र दुष्काळी घोषणा होऊनदेखील आवश्यक त्या सवलती मिळत नसल्याने शासनाची घोषणा मृगजळ ठरली आहे.
हेही वाचा : तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता…
यावर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामात शेतीपिकांना मोठा फटका बसला. यामुळे उत्पन्नात घट झाली. रब्बी हंगामदेखील संकटात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बहुतांश महसूल मंडळे दुष्काळाने होरपळली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अनेक भागातील पेरा वाया गेला, उत्पन्न घटले असून यासाठी आर्थिक मदत किती मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे टॅंकरने पाणीपुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावातील वीज कनेक्शन खंडित न करणे, या सवलती द्याव्यात, अशी मागणी जि.प.सदस्या सरस्वती मोहन चौधरी यांनी केली आहे.