वाशिम: गेल्या दोन ते तीन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज २७ जुलै रोजी सकाळ पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून कुठे रिमझिम तर कुठे चांगला पाऊस होत असल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ४८ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गत दोन ते तीन दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. आज २७ जुलै रोजी सकाळ पासून वाशीम शहरात चांगला पाऊस झाला तसेच शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. कुठे रिमझिम तर कुठे चांगला पाऊस होत असून ढगाळ वातावरण पसरले आहे.
हेही वाचा… ३१ वर्षांनी एकत्र आलेल्या शाळकरी मित्रांना बबलीच्या तिन्ही बछड्यांचे दर्शन
नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून पिके खरडून गेली आहेत. त्यातच होत असलेल्या सततधार पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प पूर्णपणे भरला असून पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली असून पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहेत.