लोकसत्ता टीम
वाशीम: जिल्ह्यात गत काही दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. २५ एप्रिल रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे टोमॅटो, आंबा आणि उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यापूर्वीही झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, गारपिटीने अनेक शेतकरी उध्वस्त होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अजूनही जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात वरोली, चिखली, कारखेडा,जामदारा, घोटी तर कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट सह मालेगाव तालुक्यातील काही भागात २५ एप्रिल रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे टमाटो, आंबा, ज्वारी, बाजरी, मूंग तसेच उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. यापूर्वी देखील जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले आहे.
हेही वाचा… बुलढाणा: गाढ झोपेची किंमत साडेतीन लाख; नांदुऱ्यातील गुरुजींना दे धक्का
सध्याही पंचनामे केले जात आहेत. मात्र, तात्काळ पीक नुकसान भरपाई मिळत नाही आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे असल्याची वल्गणा केली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय राठोड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.