वाशीम : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. मात्र सध्या शेतकरी वेग वेगळ्या अडचणीचा सामना करीत आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट तर दुसरीकडे खाबुगिरीचा प्रचंड मनःस्ताप शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मात्र, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला.
रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतात डीपी घेतली.मात्र लाईनमन शेतकऱ्याला वीज जोडणी केल्याचा मोबदला मागून अडवणूक करू लागला. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने ही बाब लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून फिर्याद दिली. यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष एक हजार रुपये घेताना लाईनमन याला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कुणाल मोहन सिंग छार या लाईनमन विरोधात रिसोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा : नागपूरकरांनो लक्ष द्या… उद्या ‘या’ वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा नाही
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, पोहवा असिफ शेख, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरद, चालक नावेद शेख आदींनी केली. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु असून अपुऱ्या पावसामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मदार विजेवर अवलंबून आहे. मात्र पावलो पावली शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.