वाशीम : एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांना शासकीय कामासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे एका साध्या दाखल्यासाठी दोन आठवडेभरापासून ६० वर्षीयवृद्ध महिला तहसील कार्यालयाचे उंबरठे झीझवीत आहे.
हेही वाचा : उमरखेड : बसजळीत प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद
रिसोड तालुक्यातील वाकद येथील ६० वर्षीय वृद्ध शांताबाई अंभोरे यांना तलाठ्याकडून एक दाखला घायचा आहे. मात्र, तलाठी गावातच येत नसल्याने सदर महिला गेली दोन आठवड्यापासून रिसोड तहसीलच्या चकरा मारत आहे. ती वृद्ध महिला तहसील कार्यालयात येण्यापूर्वी घरूनच भाकरीच गठुड बांधून आली होती. मात्र या ठिकाणी तलाठी भेटलाच नाही किंवा कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मदत मिळाली नसल्याने हताश होऊन घरी गेली. अशा अनेक घटना जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयात दिसून येतात. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कुणासाठी? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.