वाशीम : विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हिंगोलीवरून वाशीमकडे येत असताना वाशीम जवळील उड्डाण पुलाजवळ लावलेल्या वाशीम, पुसद फलकाची दिशा संभ्रम करणारी असल्याने वाहन चालकांना नाहक ५ किमी पेक्षा अधिक अंतराचा फेरा पडत आहे. तर अनेकांना पुसदकडे जाताना वळण मार्गच सापडत नसल्याने प्रवाशी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग १६१ चे नव्याने काम करण्यात आले आहे. हा मार्ग विदर्भ – मराठवाडा आणि पुढे तेलंगणा राज्याला जोडतो. मात्र या महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशा दर्शन फालकांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ हा भारतातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ हा अकोला, वाशिम , हिंगोली, नांदेड, देगलूर, बिचकुंडा, पिटलाम, निजामपेट, शंकरमपेठ (ए), जोगीपेठ, सांगा रेड्डी या शहरांना जोडण्यात आले असून या मार्गावर दूरवरील कंटेनर, ट्रक, बसेस, खासगी वाहतूक वाढली आहे.

हेही वाचा : खा. अनिल बोंडे म्हणतात, “विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मस्ती…”

हिंगोली वरून वाशीमकडे जात असताना अनेक वाहन चालक वाशीम जवळ येताच बुचकळ्यात पडतात. वाशीम येण्यापूर्वी ९ किमी अंतर असताना बोराळा गावाजवळील उड्डाण पुलाजवळ वाशीम कडे जाणारा वळण मार्ग छोटया फलकावर दर्शविण्यात आला आहे. मात्र वाहनांचा वेग अधिक असल्याने अनेकांचे त्या फालकांकडे लक्ष जात नाही. अजून थोडं वाशीम जवळ येत असताना एम आय डी सी परिसरातील महाबीज जवळ भव्य दिशा दर्शक कमान लावण्यात आली असून त्यावर वाशीम, पुसद कडे जाणारा दिशा दर्शक फलक लावलेला आहे. परंतू या फलकापासून समोर वळण घेण्यासाठी मार्गच नसल्याने अनेकांना ५ किमी पेक्षा अधिक अंतरावर फेरा घेऊन माघारी यावे लागते किंवा त्यापुढेही जाण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लावलेले दिशादर्शक फलक बदलावे, किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

सर्व्हिस मार्ग अर्धवट ; प्रवाशांना मनस्ताप

हिंगोली वाशीम महामार्ग नव्याने बांधण्यात आला आहे. वाशीम एमआयडीसी ते रिसोड मार्गदरम्यान सर्व्हिस मार्ग दाखविण्यात आले आहेत. परंतू हा मार्ग अर्धवट आहे. त्यामुळे प्रवाशी अनेकदा या मार्गाने जातात आणि परत येतात. यामध्ये प्रवाशांचा वेळ खर्च होत असून अर्धवट कामामुळे मनस्ताप सोसावा लागत आहे.

हेही वाचा : ‘चिखलफेक’ महागात! काँग्रेस जिल्हाध्यक्षासह सत्तावीस पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

चुकीच्या फलकांमुळे दिशाभूल

हिंगोलीकडून वाशीमकडे जात असताना वाशीमजवळ लावलेली दिशा दर्शक कमान ९ किमी आधीच पाहिजे होती. बोराळा गावाजवळील उड्डाणपुला आधी लावलेली छोटीशी पाटी भरधाव वाहन असल्यामुळे वाचण्यात येत नाही. त्यामुळे वाशीम, पुसदकडे जाणाऱ्या वाहणांना मोठा फटका सोसावा लागत आहे.

मोहन चौधरी, वाशीम