अकोला : वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबरला येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे मात्र प्रचंड हाल होतांना दिसत आहे. पोहरादेवी येथे कार्यक्रमस्थळी बंदोबस्तातील शेकडो पोलिसांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पोलिसांना चक्क ‘व्हॉल्व’मधून गळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचा प्रकार समोर आला. जेवण देखील अपुरे पडले. याची एक चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. पोहरादेवी येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमस्थळाच्या सभोवताली ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, ‘पॅराग्लायडर’, ‘पॅरामोटर्स’, ‘हँडग्लायडर्स’ आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोहरादेवी येथे हजारो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी मात्र येथे पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : सात कोटी खर्चूनही प्रशिक्षणाचे ‘विमान’ जमिनीवरच; ओबीसी समाजातील मुलांच्या नशिबी…

पोलीस तहान लागल्याने व्याकूळ

पोहरादेवी येथे बंदोबस्तातील पोलिसांसाठी साधे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. विदर्भात सध्या ‘ऑक्टोबर हिट’चे चटके बसत आहेत. वाढत्या तापमानामुळे जीव पाणी-पाणी करीत आहे. तहान लागल्यामुळे व्याकूळ झालेल्या पोलिसांना अखेर जलवाहिनीच्या ‘व्हॉल्व’मधून गळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागला. ‘व्हॉल्व’मधून गळणारे पाणी पिण्यासाठी बंदोबस्तातील पोलिसांनी एकच गर्दी केली.

व्हॉल्वमधील पाणी कागदाच्या पेल्यात घेऊन पोलीस आपली तहान भागवत असल्याचे चित्र पोहरादेवी येथून समोर आले. याची एक चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल झाली.

हेही वाचा : संजय राठोड म्हणाले, “अपघात झालाय, मी सुखरूप; पण, घातपात असण्याची शक्यता”

जेवण देखील अपुरे

पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची देखील योग्य व्यवस्था नाही. बंदोबस्तातील पोलिसांना जेवण अपुरे पडल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. या प्रकारावरून बंदोबस्तातील पोलिसांमध्ये संतापाची भावना आहे.